पुणे : सीए म्हणजेच सनदी लेखापालाने घरबसल्या केवळ काही दिवसांत १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवल्याची बाब समोर आली आहे. सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट व्हायरल झाली असून त्यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. ही कमाई या सीएने केवळ लोकांची प्राप्तिकर विवरणपत्रे भरून केल्याचा दावा करण्यात आला आहे.

प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची मुदत नुकतीच संपली. ही मुदत संपण्याआधी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची घाई मोठ्या प्रमाणात दिसून आली. प्राप्तिकर विभागाकडून विवरणपत्रे भरण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस अधिकाधिक सोपी केली जात आहे. तरीही नागरिकांकडून विवरणपत्रे भरण्यासाठी सीएची मदत घेतली जात असल्याचे चित्र आहे. या काळात सीएंचे काम अनेक पटींनी वाढल्याचे दिसून येते. विवरण पत्रे भरणे म्हणजे किचकट आणि डोकेदुखीची प्रक्रिया असा अनेकांचा समज अजूनही आहे. त्यामुळे हे काम सीए कडे झोपून निर्धास्त होणारे करदातेही तेही मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

उत्पन्न नेमके कसे?

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. परितोष शर्मा यांनी ‘एक्स’वर ही पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझा एक सीए मित्र पुण्यात राहतो. त्याने तीन वर्षांपूर्वी लोकांना प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मदत करण्यास सुरुवात केली. आता त्याच्याकडे सुमारे ४०० ग्राहक आहेत. एवढ्या जणांची प्राप्तिकर विवरणपत्रे तो दरवर्षी भरतो. एका प्राप्तिकर विवरणपत्रासाठी ३ हजार म्हणजेच एकूण १२ लाख रुपये तो मिळवतो. प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याचा कालावधी काही दिवसांचा असतो. त्यामुळे अगदी मोजक्या दिवसात तो एवढे उत्पन्न मिळवतो. या काळात त्याच्याकडे कामाचा बोजा वाढत असल्याने तो दोन मदतनीसही नेमतो.

नोकरीपेक्षा जास्त पैसे

या सीएने प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यापासून सुरुवात केली असली तरी त्याच्याकडे आता इतरही वित्तीय कामांचा ओघ वाढू लागला आहे. ग्राहक वित्तीय नियोजनाशी निगडित अनेक कामे त्याच्याकडे आणू लागले आहेत. व्यवसाय नोंदणी,  नियमनाशी निगडित गोष्टी अशी अनेक कामे तो सध्या करीत आहे. त्यामुळे त्याच्या उत्पन्नातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकंदरीत विचार केल्यास पूर्ण वेळ नोकरीपेक्षा हा सीए घरबसल्या अधिक पैसे मिळवत आहे. तुमचे कौशल्य आणि ग्राहकांशी चांगले संबंध या जोरावर उत्तम संधी निर्माण करता येते, हे यातून सिद्ध झाले आहे,  असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे