Qatar Airways Consumer Court Fine : आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करताना २ अल्पवयीन मुलांना ऐनवेळी प्रवेश नाकारणाऱ्या विमान कंपनीला ग्राहक न्यायालयाने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतामधून इटलीला परतणाऱ्या एका दांपत्याच्या दोन लहान मुलांना ‘कतार एअरवेज’ने विमानात बसवण्यास नकार दिला. धक्कादायक म्हणजे यात एक स्तनपान करणाऱ्या अडीच महिन्यांच्या बाळाचा समावेश होता. या प्रकरणी ‘कतार एअरवेज’ला ग्राहक न्यायालयाने दोषी धरले असून एअरलाईन्सला तब्बल १० लाख रुपयांची भरपाई आणि २५,००० रुपये न्यायालयीन खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके काय घडले होते?
केरळमधील एक दांपत्य इटलीमध्ये नोकरी करण्यास आहे. २०१८ मध्ये ते त्यांच्या दोन लहान मुलांसह व्हेनिस (इटली) वरून दोहामार्गे कोची (केरळ) येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. येताना कतार एअरवेजने त्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना बोर्डिंग पास दिले होते. मात्र, ३ डिसेंबर २०१८ रोजी कोचीहून इटलीला परतताना, विमान कंपनीने या कुटुंबाला तब्बल अडीच तास ताटकळत ठेवले. त्यानंतर “मोठ्या मुलाकडे स्वतंत्र इटालियन व्हिसा नाही,” असे कारण सांगत त्याला विमानात घेण्यास नकार दिला. नोकरी जाण्याच्या भीतीने, पालकांनी मोठ्या मुलाला केरळमधील नातेवाईकांकडे सोडले आणि ते लहान मुलासह विमानाने रवाना झाले.
दोहामध्ये लहान मुलालाही रोखले
हे कुटुंब जेव्हा विमान बदलण्यासाठी ‘दोहा’ येथे पोहोचले, तेव्हा एअरलाईन्सने पुन्हा अजब पवित्रा घेतला. त्यांनी दुसऱ्या (लहान) मुलाकडेही आवश्यक कागदपत्रे नसल्याचे सांगत त्याला पुढील प्रवासाला नकार दिला. बोर्डिंग पास असूनही त्यांना १० तास थांबवून ठेवण्यात आले. अखेर आईला एकटीलाच इटलीला जावे लागले आणि वडिलांना बाळासह पुन्हा कोचीला परतावे लागले. या सर्व प्रकारामुळे पालकांना त्यांच्या पोटच्या मुलांपासून दूर राहावे लागले, ज्यामध्ये एका स्तनपान करणाऱ्या बाळाचा समावेश होता. यामुळे कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास आणि मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
‘प्रवाशांची जबाबदारी’ सांगणारा एअरलाईन्सचा युक्तिवाद अमान्य
एर्नाकुलम ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डी. बी. बिनू आणि सदस्य रामचंद्रन व्ही. व श्रीविद्या टी. एन. यांनी या खटल्याचे काम पाहिले. न्यायालयात कतार एअरवेजने स्वतःचा बचाव करताना युक्तिवाद केला की, “प्रवासासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे आणि व्हिसाची तपासणी करण्याची अंतिम जबाबदारी ही पूर्णपणे प्रवाशांचीच असते.” मात्र, ग्राहक न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायालयाने स्पष्ट केले की, जेव्हा एअरलाईन्सने जाताना त्याच कागदपत्रांच्या आधारे प्रवास करू दिला, तर मग परतीच्या प्रवासात त्याच कागदपत्रांवर आक्षेप घेणे हा सरळ-सरळ सेवेतील निष्काळजीपणा आणि ग्राहकांचे शोषण आहे.
न्यायालयाने दिलेले महत्त्वाचे आदेश
नोकरी गमावण्याच्या भीतीने या दांपत्याकडे त्यांच्या मुलांना आणि एका स्तनपान करणाऱ्या नवजात बालकाला भारतात नातेवाईकांच्या भरवशावर सोडून जावे लागले. पालकांनी सहन केलेली मानसिक अस्वस्थता, भावनिक आघात आणि अतोनात हाल हे केवळ आणि केवळ विमान कंपनीच्या चुकीच्या आणि बेजबाबदार वर्तनाचा थेट परिणाम आहे,” असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले.
