Quit Job to Start Business Success Story : सध्या तंत्रज्ञान क्षेत्रापासून वाहन निर्मिती क्षेत्रापर्यंत नोकऱ्यांमध्ये मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडणे म्हणजे वेडेपणा समजला जातो. ३३ वर्षीय तरुणाने मोठ्या पगाराची नोकरी सोडल्यानंतर नातेवाईकच नाही तर कुटुंबातील लोकही त्याला हेच बोलले. मात्र, आता हाच तरुण महिन्याला १ लाख ८० हजार रुपये कमावत आहे, तेही गावाकडे राहून. त्याचा हा प्रवास त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.
तरुणाची पोस्ट काय आहे?
तरुणाने दोन वर्षांपूर्वी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःची मार्केटिंग सर्व्हिस एजन्सी सुरू केली. सध्या तो महिन्याला १.८ लाख रुपयांहून अधिक कमाई करत असल्याचे त्याने लिहिलंय. ‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘r/Indian_flex’ या ग्रुपवर त्याची ही यशोगाथा सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी ३ मोलाचे सल्ले दिले आहेत.
केवळ पैशांसाठी नोकरी सोडली नाही!
सध्या पगारापेक्षा जास्त पैसे कमावत असल्याने, त्यासाठीच नोकरी सोडल्याचं अनेकांना वाटू शकते. पण, तरुणाने लिहिलंय की मला माझं आवडीचं काम माझ्या कुटुंबासोबत राहून करायचं असल्याने मी हा निर्णय घेतला. हा माझ्या सुखी आयुष्याचा ‘फ्लेक्स’ (Life Flex) आहे. पण इथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. एक काळ असा होता जेव्हा मी कॉर्पोरेट नोकरीत दररोज १४ ते १६ तास काम करायचो. आता मागे वळून पाहताना ते पूर्वआयुष्य असल्यासारखे वाटते.
२०२४ च्या मध्यावर कॉर्पोरेट जगतातून बाहेर पडल्यानंतर, या तरुणाने सुरुवातीचे काही महिने क्लायंट शोधण्यात, कामाची पद्धत सुधारण्यात आणि व्यवसायाची घडी बसवण्यात घालवले. सध्या त्याच्याकडे ३ मोठे नियमित क्लायंट्स असून, या वर्षाच्या अखेरीस आणखी काही मोठे करार करण्याची त्याची तयारी सुरू आहे.
९ ते ५ च्या कटकटीतून मुक्ती आणि गावी राहून ‘रिमोट वर्क’
तरुण म्हणतो, व्यवसायामुळे केवळ आर्थिक परिस्थिती सुधारली नाही तर ९ ते ५ च्या चक्रातून बाहेर पडलो. रोजच्या प्रवासाचा त्रासही संपला आहे. जर मला दुपारी भाजीपाला आणायला जायचे असेल किंवा कामाच्या दिवशी माझ्या मुलीला समुद्रकिनाऱ्यावर फिरायला नेऊन वेळ घालवायचा असेल, तर मी ते सहज करू शकतो. सध्या मी माझ्या गावाकडच्या घरातून, पावसाळ्याचा आनंद घेत ‘रिमोट वर्क’ करत असल्याचं त्याने सांगितले.
नवउद्योजकांसाठी यशाची ३ सुत्रे
१. आधी आर्थिक पूर्वतयारी करा, मगच नोकरी सोडा
स्वतःवर कितीही आत्मविश्वास असला, तरी पुरेशी आर्थिक तरतूद किंवा बचतीचा बॅकअप असल्याशिवाय चालू नोकरीचा राजीनामा देण्याची चूक करू नका. व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीचे काही महिने उत्पन्न शून्य असू शकते, अशा वेळी घरखर्च चालवण्यासाठी बॅकअप प्लॅन असणे आवश्यक आहे.
२. छोट्या क्लायंट्सना कमी लेखू नका
नेहमीच खूप जास्त पैसे देणाऱ्या मोठ्या क्लायंट्सच्या मागे धावू नका. “अनेकांना हे विचित्र वाटेल, पण कमी पैसे देणाऱ्या माझ्या सुरुवातीच्या क्लायंट्सनी मला व्यवसायाची मजबूत प्रणाली कशी उभारायची, हे शिकवले. मोठे क्लायंट्स आले की अनेकदा माणसामध्ये आळस येतो आणि तो नवीन प्रयोग करणे थांबवतो,” असे त्याने सांगितले.
३. व्यक्तीवर नव्हे, ‘सिस्टम’वर भर द्या
तुमचा व्यवसाय केवळ तुमच्या वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून नसावा. व्यवसायाचे नियम, प्रमाणित कार्यपद्धती आणि आराखडा तयार असायला हवा. तुमच्या कामामुळे क्लायंटला किती परतावा मिळत आहे, हे त्यांना आकड्यांमध्ये दाखवता आले पाहिजे. जर ही रचना तुम्हाला जमली नाही, तर व्यवसायाचा विचारही करू नका.
