Radhika Gupta Warning On Global Investment: जागतिक पातळीवर वेगाने बदलणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रवाहांवर आंधळेपणाने विश्वास ठेवून पैसे गुंतवणे भारतीय गुंतवणूकदारांसाठी धोक्याचे ठरू शकते, असा इशारा ‘एडलवाइज म्युच्युअल फंड’च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता यांनी दिला आहे. सध्या जागतिक बाजारात दक्षिण कोरियाच्या बाजाराची चर्चा सुरू असून, हा ट्रेंड देखील पूर्वीच्या ‘चांदी’सारखाच ठरू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

गुंतवणूकदारांनी कोणत्याही देशाच्या किंवा कमोडिटीच्या अल्पकालीन कामगिरीला भुलून गुंतवणूक न करता दीर्घकालीन धोरण आणि ‘ॲसेट अलोकेशन’वर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे ‘चांदी’चा संदर्भ?

काही काळापूर्वी कमोडिटी बाजारात चांदीमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. त्यावेळी अनेक गुंतवणूकदारांनी इतर फायदेशीर पर्याय सोडून केवळ चांदीमध्ये मोठी गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर बाजारात झालेल्या घसरणीमुळे अनेकांचे नुकसान झाले किंवा परतावा अडकून पडला. याच पार्श्वभूमीवर राधिका गुप्ता यांनी दक्षिण कोरियाच्या सध्याच्या वाढत्या लोकप्रियतेची तुलना चांदीशी केली आहे. “सध्या दक्षिण कोरिया हा गुंतवणुकीच्या जागतिक बाजारात ‘नवी चांदी’ बनत चालला आहे,” असे सूचक विधान त्यांनी केले.

आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत ‘स्ट्रॅटेजिक’ दृष्टिकोन हवा

राधिका गुप्ता यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुंतवणूक करणे चुकीचे नाही, परंतु ते केवळ एखाद्या विशिष्ट देशाच्या तात्पुरत्या तेजीला पाहून केले जाऊ नये. आपल्या एकूण पोर्टफोलिओच्या १० ते १५ टक्के भाग हा आंतरराष्ट्रीय बाजारात असावा, जेणेकरून भौगोलिक विविधतेचा फायदा मिळेल. जागतिक पातळीवर कितीही अनिश्चितता असली, तरी भारताची अर्थव्यवस्था सध्या सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील दीर्घकालीन संधींकडे दुर्लक्ष करू नका.

“गुंतवणूक करणे हा एक प्रदीर्घ प्रवास आहे, जिथे चढ-उतार हे अगदी नैसर्गिक आहेत. कोणताही ‘परफेक्ट टाईम’ शोधत बसण्यापेक्षा शिस्तबद्ध पद्धतीने आणि योग्य विविधीकरण करून गुंतवणूक टिकवून ठेवणे हाच संपत्ती निर्मितीचा एकमेव मार्ग आहे.” – राधिका गुप्ता, मुख्याधिकारी, एडलवाइज म्युच्युअल फंड.