Edelweiss Mutual Fund Radhika Gupta Vs Shankar Sharma’s critical views on SIP investors: एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीईओ, राधिका गुप्ता यांनी, शेअर बाजार क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ शंकर शर्मा यांनी एसआयपी गुंतवणूकदारांवर केलेल्या ‘ब्रेनवॉश्ड’ टीकेला एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
भारताने ब्रेनवॉश्ड गुंतवणूकदारांची पिढी कशी निर्माण केली
जीक्वांट इन्व्हेस्टेकचे संस्थापक असलेल्या शंकर शर्मा यांनी नुकतेच, २०२५ मध्ये लिहिलेला त्यांचा एक लेख पुन्हा एकदा एक्सवर शेअर केला होता, ज्याचा मथळा “भारताने ब्रेनवॉश्ड गुंतवणूकदारांची पिढी कशी निर्माण केली. आणि यामुळे निर्माण झालेली मोठी आर्थिक आपत्ती”, असा होता.
या लेखात, त्यांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर टीका केली होती आणि सध्याच्या ट्रेंडला “इतिहासातील सर्वात मोठे संपत्ती हस्तांतरण” म्हटले होते. त्यांनी असाही दावा केला होता की, हे वेल्थ मॅनेजर्स, ब्रोकर्स आणि आर्थिक माध्यमांच्या सक्रिय सहभागाने घडत आहे.
शंकर शर्मा यांनी ३१ मार्च रोजी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते की, “मी काही काळापूर्वी जे लिहिले होते ते पुन्हा वाचण्यासाठी आजचा दिवस अगदी योग्य आहे. ज्या लेखाचा उल्लेख तेव्हा आदरणीय राधिका गुप्ता यांनी केला होता आणि त्याला ‘क्लिकबेट’ म्हटले होते.”
शर्मा यांच्या मते, “या वेळी परिस्थिती वेगळी आहे” अशा प्रकारच्या मांडणींनी गुंतवणूकदारांची दिशाभूल केली आहे. त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळात भारतीय गुंतवणूकदारांनी परदेशी गुंतवणूकदारांवर मात केली होती. मात्र या वेळी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या नुकसानीतून नफा कमावला आहे. त्यांच्या मते, यामुळे एक “व्यापक संकट” निर्माण झाले आहे.
टीकाकार महत्त्वाचा नसतो, तर…
शंकर शर्मा यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना गुप्ता यांनी म्हटले, “शेअर बाजारात विविध चक्रे येत असतात, ज्यात तेजी, घसरण आणि या दोन्हींच्या मधले सर्व टप्पे येतात. परिणाम ते कधीही एकसारखे नसतात. घसरण, संकट किंवा युद्धाच्या काळात, कोणताही डेटा किंवा आकडेवारी टीकाकाराच्या बाजूनेच असते. तेजीच्या काळात याच्या उलट घडते. वास्तव, नेहमीप्रमाणे, या दोन्हींच्या मध्येच कुठेतरी असते.”
म्युच्युअल फंड घोटाळा का नाही, यावरील आपल्या पूर्वीच्या भूमिकेचा राधिका गुप्ता यांनी बचाव केला. त्यांनी स्पष्ट केले की, एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स) हे गुंतवणूकदारांना कालांतराने सातत्याने सहभागी होण्यास मदत करण्यासाठी तयार केले आहेत, बाजारातील चढ-उतार किंवा तोटा दूर करण्यासाठी नाही.
“कालांतराने, हा दृष्टिकोन बहुतेक गुंतवणूकदारांसाठी अधिक सट्टेबाजीच्या किंवा वेळेवर आधारित दृष्टिकोनांपेक्षा अधिक प्रभावी ठरला आहे (येथे F&O आणि थेट इक्विटीच्या परताव्यांची साधी तपासणी उपयुक्त ठरू शकते). त्यांचे मूल्यमापन दीर्घ कालावधीच्या दृष्टिकोनातून केले पाहिजे”, असे त्या म्हणाल्या.
राधिका गुप्ता यांनी त्यांच्या एक्स पोस्टचा समारोप करताना सांगितले की, संपत्ती निर्मितीसाठी निराशावादाऐवजी आशावाद आणि शिस्त ही गुरुकिल्ली आहे. “निराशावादी होणे सोपे आहे, पण आशावादी असणे अधिक फायदेशीर आहे. शेवटी, टीकाकार महत्त्वाचा नसतो, तर कृती महत्त्वाची असते. श्रेय त्यालाच जाते जो प्रत्यक्ष मैदानात असतो”, असे त्यांनी नमूद केले.
वादाची पार्श्वभूमी
शंकर शर्मा यांची ही पोस्ट विशेषतः ज्यामध्ये त्यांनी गुप्ता यांचा थेट नामोल्लेख केला होता, त्यांच्या स्वतःच्या लेखाच्या काही दिवसांनंतर आली. कारण शर्मांच्या लेखानंतर, गुप्ता यांनी त्याच संकेतस्थळावर आपले मत प्रकाशित केले होते. त्या लेखाचे शीर्षक होते, “म्युच्युअल फंड्स म्हणजे एक प्रकारचा घोटाळा आहे, अशा आशयाचे ‘क्लिकबेट’ लेख नागरिकांची कोणतीही सेवा करत नाहीत: राधिका गुप्ता.”
त्या लेखात त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, “जे लोक एसआयपी मध्ये गुंतवणूक करतात, त्यांना त्यातून नक्कीच पैसा मिळतो. हो, ही पद्धत कदाचित पूर्णपणे निर्दोष नसेल. पण ती अतिशय उत्तम प्रकारे काम करते.”
