Raghav Chadha Joint ITR Proposal for Married Couples Income Tax India update from Parliament : आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी विवाहित जोडप्यांसाठी एकत्रितपणे आयकर रिटर्न (ITR) भरण्याची पर्याय देण्यात यावा असा प्रस्ताव सादर केला आहे. यावेळी त्यांनी ज्या कुटुंबांमध्ये फक्त एकच व्यक्ती कमावती आहे, अशा कुटुंबांवर सध्याच्या कर प्रणालीमध्ये अन्याय होतो असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

राघव चड्ढा यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी चड्ढा म्हणाले की, जरी दोघे मिळून एकच घर चालवत असतील आणि दोघे मिळून सगळा खर्च वाटून घेत असले तरी सध्याची आयकर प्रणाली ही अशा विवाहित जोडप्याला दोन वेगवेगळ्या व्यक्ती मानते.

राघव चड्ढा यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, “आज मी संसदेत विवाहित जोडप्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ऐच्छिक एकत्रित फाइलिंगचा प्रस्ताव मांडला.” चड्ढा यांनी प्रत्येकी २० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या दोन कुटुंबांचे उदाहरण देऊन त्यांना भराव्या लागण्याऱ्या एकूण करामधील तफावत दाखवून दिली आहे.

कुटुंब अ

पहिल्या उदाहरणात, पती आणि पत्नी दोघेही प्रत्येकी १० लाख रुपये कमावतात, ज्यामुळे कुटुंबाचे एकूण उत्पन्न २० लाख रुपये होते. चड्ढा यांच्या मते, नवीन कर प्रणालीनुसार लागू सवलतींनंतर या प्रकरणात त्यांच्या कराचे दायित्व शून्य होते.

कुटुंब ब

मात्र, दुसऱ्या उदाहरणात, एक जोडीदार हा एकटाच २० लाख रुपये कमावतो, तर दुसरा जोडीदार मुलांची काळजी घेण्यासाठी घरी राहतो. कुटुंबाचे एकूण उत्पन्न दोन्हीकडे सारखेच असूनही, या कुटुंबाला मात्र १.९२ लाख रुपये आयकर भरावा लागतो.

“दोघांमध्ये पती-पत्नीमध्ये पगाराची विभागणी कशी झाली आहे, एवढाच फरक आहे,” असे चड्ढा म्हणाले. “एकच छत, एकच स्वयंपाकघर, कुटुंबाचे एकच बजेट, पण जेव्हा कर भरण्याची वेळ येते, तेव्हा मात्र कुटुंब अदृश्य होते,” असेही त्यांनी नमूद केले.

कर प्रणाली पती-पत्नीला अनेळखी व्यक्तीप्रमाणे वागवते

चड्ढा यांनी युक्तिवाद केला की, सध्याची आयकर रचना कुटुंबांना एकच इकॉनॉमिक यूनिट म्हणून ओळखण्यात अपयशी ठरते. “कर प्रणाली केवळ दोन व्यक्तींना पाहते. पती आणि पत्नी येथे परस्परां‍साठी अनोळखी ठरतात. त्यांच्या उत्पन्नाचे किंवा त्यांना मिळणाऱ्या सवलतींचे एकत्रिकरण होत नाही,” असे ते म्हणाले.

त्यांनी ऐच्छिक एकत्रित टॅक्स फाइलिंग (Optional Joint Tax Filing) ला परवानगी देण्यात यावी असे सूचित केले, ज्यानुसार विवाहित जोडपे त्यांच्यावर येणारे कराचे ओझे कमी होणार असल्यास एकत्रित आयकर रिटर्न भरण्याचा पर्याय निवडू शकतात. “जर याची अंमलबजावणी झाली, तर कुटुंब अ आणि कुटुंब ब या दोघांनाही शून्य कर भरावा लागेल,” असे चड्ढा यांनी सांगितले.

भारतातील कर संरचना कसे काम करते?

भारताच्या कर संरचनेत प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र करदाता म्हणून पाहिले जाते, म्हणजेच पती आणि पत्नीला यांचे कौटुंबिक उत्पन्न एकत्र असले, तरी त्यांचे टॅक्स रिटर्न वेगवेगळे दाखल करावे लागतात.

या रचनेमुळे कुटुंबात उत्पन्नाची विभागणी कशी झाली आहे यावरून एकूण भराव्या लागणाऱ्या करावर मोठा परिणाम होऊ शकतो, जरी कुटुंबाचे एकूण उत्पन्न सारखेच असले तरीही. करविषयक तज्ज्ञांच्या मते, ज्या कुटुंबांमध्ये फक्त एकच जोडीदार कमावता असतो आणि दुसरा जोडीदार घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी घरी राहतो, अशा कुटुंबांमध्ये हा मुद्दा अधिक ठळकपणे जाणवतो.

नवीन कर रचनेची भूमिका

चड्ढा यांनी दिलेले उदाहरण नवीन आयकर प्रणालीवर आधारित आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या बदलांनुसार, कलम ८७ ए अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीनंतर १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना शून्य कर भरावा लागतो.

मात्र जर जोडप्यातील प्रत्येकजण १० लाख रुपये कमवत असेल तर ते स्वतंत्र्यपणे श्यून्य टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतात, तर जर एकच जण २० लाख रुपये कमवत असेल तर त्यांना जास्त कर भरावा लागतो.

अनेक देशांमध्ये विवाहित जोडप्यांना त्यांचे आयकर रिटर्न एकत्रितपणे भरण्याची मुभा दिली जाते, ज्यामुळे दोघांपैकी एकजण जास्त पैसे कमवत असलेल्या कुटुंबांना याचा फायदा होतो. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये एकत्रित आयकर रिटर्न दाखल करण्यास परवानगी आहे.