Rakesh Jhunjhunwala stock market rules : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहेत. सततच्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशावेळी दलाल स्ट्रीटचे ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलेले ‘गोल्डन रूल्स’ नक्कीच कामाला येतील. राकेश झुनझुनवाला यांनी केवळ संपत्तीच कमावली नाही, तर सामान्य आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे अतिशय सोपे आणि प्रभावी मार्ग सांगितले. बाजार कितीही चढ-उतारांमधून जात असला, तरी त्यांचे विचार आजही गुंतवणूकदारांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात.

१. बाजाराची वेळ साधण्याचा प्रयत्न करू नका

झुनझुनवाला यांचा एक प्रसिद्ध मंत्र होता, “शेअर बाजार हा नेहमीच बरोबर असतो, त्यामुळे बाजाराची अचूक वेळ साधण्याचा प्रयत्न करू नका.” बऱ्याचदा किरकोळ गुंतवणूकदार शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यासाठी ‘योग्य वेळेची’ वाट पाहत बसतात किंवा बाजार घसरण्यापूर्वी विक्री करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अल्पमुदतीत असा अंदाज लावणे कठीण काम आहे. त्यामुळे शिस्तबद्ध गुंतवणूकच तुम्हाला तारू शकते.

२. बाजारातील ‘गोंधळापेक्षा’ स्वतःवर विश्वास ठेवा

जेव्हा तुम्ही एखाद्या शेअरमध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करता. अशावेळी बाजारातील अफवांकडे दुर्लक्ष करा. झुनझुनवाला यांनी ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ या कंपनीचे उदाहरण दिले होते. ते म्हणाले या शेअरबाबत बाजारात नकारात्मक वातावरण असतानाही मी शेअर खरेदी सुरुच ठेवली. ज्याचा मला पुढे मोठा फायदा झाला. उत्तम गुंतवणुकीसाठी आत्मविश्वास आणि संयम आवश्यक असल्याचे ते म्हणाले होते.

३. बाजार हा केवळ आकडेवारीवर नाही, तर ‘भावनांवर’ चालतो

शेअर बाजार केवळ आकडेवारीवर चालत नसून तो गुंतवणूकदारांच्या भावनांवरही चालतो. एखाद्या कंपनीचा मूळ व्यवसाय मिनिटा-मिनिटाला बदलत नाही. परंतु, तिच्या शेअरची किंमत मात्र क्षणोक्षणी बदलते. अतिशय महाग असणारा शेअर कंपनी चांगली असली तरी वाईट गुंतवणूक ठरू शकतो. याउलट, एखादी चांगली कंपनी अल्पकालीन संकटात सापडल्यामुळे तिचा शेअर स्वस्त मिळत असेल, तर ती गुंतवणुकीची मोठी संधी ठरू शकते.

४. अल्पमुदतीतील घसरणीला घाबरू नका

शेअरच्या किमतीत होणाऱ्या अल्पमुदतीतील चढ-उतारांनी विचलित होऊ नका. जर कंपनीचा मूळ व्यवसाय मजबूत असेल, तर शेअरच्या किमतीतील घसरण ही केवळ तात्पुरती असते. किमती घसरल्या की लगेच घाबरून विक्री करण्याऐवजी, कंपनीची कामगिरी अजूनही उत्तम आहे का, याची पडताळणी करा आणि संयम राखा.

५. चुका स्वीकारायला शिका आणि त्यातून धडा घ्या

झुनझुनवाला म्हणतात, की शेअर बाजारात एकदाही तोटा सहन केला नाही, असा गुंतवणूकदार सापडणार नाही. त्यामुळे चुका टाळण्यापेक्षा त्या स्वीकारणे आणि त्यातून शिकणे जास्त महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादा निर्णय चुकतो, तेव्हा बाजाराला दोष देण्याऐवजी स्वतःची चूक मान्य करा, जेणेकरून तीच चूक पुन्हा घडणार नाही.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.