लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत शेअर बाजारात सूचिबद्ध उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या कच्च्या मालाच्या खर्चात वार्षिक आधारावर २७.५ टक्क्यांची मोठी वाढ ही जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांनंतरही दिसून आली, असे रिझर्व्ह बँकेने गुरुवारी सूचित केले. या कंपन्यांनी ‘किंमत निर्धारणाची क्षमता’ टिकवून ठेवत नफाक्षमतेतही सुधारणा केल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.

कच्चा माल आणि विक्री यांचे गुणोत्तर मागील तिमाहीतील ५८.५ टक्क्यांवरून, २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत ५८.१ टक्क्यांवर घसरले आहे. उत्पादन खर्चात वाढ होऊनही, कंपन्यांच्या परिचालन नफ्यातील वाढीचा दर लक्षणीयरीत्या सुधारला आहे. मागील तिमाहीतील ९.४ टक्क्यांवरून तो २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर २१.३ टक्क्यांवर पोहोचला. माहिती-तंत्रज्ञान (आयटी) आणि बिगर-आयटी सेवा कंपन्यांच्या परिचालन नफ्यातील वाढीचा दरही अनुक्रमे १९.९ टक्के आणि १२.७ टक्क्यांपर्यंत वाढला. सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये परिचालन नफ्याचे प्रमाण तिमाहीगणिक सुधारल्याचे रिझर्व्ह बँकेने नमूद केले.

खासगी क्षेत्रातील ३,२४७ सूचिबद्ध कंपन्यांच्या तिमाही आर्थिक निकालांवर आधारित या आकडेवारीनुसार, एकूण विक्री वाढीचा वेग मागील तिमाहीतील १३.९ टक्क्यांवरून २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत १९.४ टक्क्यांपर्यंत वाढला. १,८२७ सूचिबद्ध उत्पादन कंपन्यांच्या विक्रीत वार्षिक आधारावर २१.४ टक्क्यांनी वाढ (जी मागील तिमाहीत १४.५ टक्के होती) झाली. यात प्रामुख्याने ऑटोमोबाईल, पेट्रोलियम आणि विद्युत यंत्रसामग्री उद्योगांचा वाटा मोठा होता. या तिमाहीत माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीत १४.८ टक्क्यांनी वाढ झाली, तर बिगर-आयटी सेवा कंपन्यांनी १९.७ टक्क्यांची वाढ नोंदवली.

विविध क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांवरील खर्चही वाढला. उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांसाठी तो १२.४ टक्क्यांनी, आयटी कंपन्यांसाठी ७.६ टक्क्यांनी आणि बिगर-आयटी सेवा कंपन्यांसाठी ११.२ टक्क्यांनी वाढला. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या ‘कर्जावरील व्याज फेडीच्या गुणोत्तरा’त सुधारणा होऊन ते १०.२ वर पोहोचले. याचे कारण म्हणजे व्याजाच्या खर्चातील वाढीपेक्षा त्यांच्या एकूण नफ्यातील वाढ अधिक वेगाने झाली. त्याच वेळी, आयटी-व्यतिरिक्त सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे हे गुणोत्तर २.६ पर्यंत वाढले.