मुंबई : अर्थव्यवस्थेत देशातील सर्वाधिक मूल्याचे चलन असलेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ११.२ टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून समोर आली आहे. मात्र, याच काळात ५०० रुपयांच्या बनावट नोटा पकडण्याच्या प्रमाणात २० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, मार्च २०२६ अखेर ५०० रुपयांच्या नोटांची संख्या ७,०५,४८२ लाखांवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी मार्च २०२५ मध्ये ६,३४,४५८ लाख इतकी होती. मूल्याच्या दृष्टीने विचार केल्यास, ५०० रुपयांच्या एकूण नोटांचे मूल्य ३१.७२ लाख कोटी रुपयांवरून वाढून ३५.२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सध्या बाजारात असलेल्या एकूण चलनामध्ये एकट्या ५०० रुपयांच्या नोटांचा वाटा तब्बल ८६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
संख्येच्या बाबतीत, एकूण चलनात ५०० रुपयांच्या नोटांचा वाटा ४१.२ टक्के असून त्यापाठोपाठ १० रुपयांच्या नोटांचा वाटा १६.१ टक्के आहे.
रोखीची मागणी कायम
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण चलनी नोटांच्या मूल्यात ११.९ टक्के आणि संख्येत १०.५ टक्के वाढ झाली आहे. हे आकडे देशात रोख पैशांची (कॅश) मागणी अजूनही मोठ्या प्रमाणावर कायम असल्याचे दर्शवतात. दुसरीकडे, मे २०२३ मध्ये चलनातून बाद केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा परत येण्याची प्रक्रिया या वर्षातही सुरू होती. घोषणा झाली तेव्हा बाजारात ३.५६ लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या, त्यापैकी ३१ मार्च २०२६ पर्यंत ९८.४५ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे माघारी आल्या आहेत.
चलनी नोटा आणि नाण्यांची सद्यस्थिती (३१ मार्च २०२६ पर्यंत)
– नाण्यांच्या प्रमाणात वाढ: वर्ष २०२५-२६ मध्ये नाण्यांचे एकूण मूल्य ११.४ टक्क्यांनी आणि संख्या ४.५ टक्क्यांनी वाढली आहे. एकूण नाण्यांमध्ये १ रुपया, २ रुपये आणि ५ रुपयांच्या नाण्यांचा वाटा संख्येत ८०.७ टक्के, तर मूल्याच्या बाबतीत ६०.२ टक्के आहे.
– १० रुपयांच्या नोटांची छपाई वाढली: रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, लहान नोटांची मागणी वाढल्याने १० रुपयांच्या नोटांची छपाई १८,००० नोटांवरून थेट ४६,००० नोटांवर नेण्यात आली आहे. तर दुसरीकडे मोठ्या मूल्याच्या नोटांची छपाई कमी केली आहे. पाचशे रुपयांच्या नोटांची मागणी १.२ लाख नोटांवरून १.१ लाख नोटांवर आली आहे, तर २०० रुपयांच्या नोटांची छपाई ४०,००० वरून थेट १५,००० वर घसरली आहे.
– नोटांची छपाई कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याचा एकूण खर्च कमालीचा कमी झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये छपाईवर ६,३७९ कोटी रुपये खर्च झाले होते, जे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये घटून ४,८७५ कोटी रुपयांवर आले आहेत.
बनावट नोटांच्या प्रमाणात ५.७ टक्क्यांची वाढ
देशातील बँकिंग व्यवस्थेमध्ये बनावट नोटा पकडल्या जाण्याच्या प्रमाणात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ५.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपये मूल्याच्या बनावट नोटांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे, तर १०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण घटले आहे.
वर्ष २०२५-२६ मध्ये बँकिंग प्रणालीत एकूण २,२९,७४६ बनावट नोटा सापडल्या, तर याआधीच्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) हा आकडा २,१७,३९६ इतका होता. पोलिसांकडून किंवा इतर तपास यंत्रणांकडून जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांचा या आकड्यात समावेश नाही.
पाचशेशी नोट स्वीकारताना काय वैशिष्ट्यांकडे लक्ष द्यावे
-नोट प्रकाशात धरल्यावर ‘५००’ असा वॉटरमार्क आणि महात्मा गांधींची प्रतिमा दिसते.
-सुरक्षा धाग्यावर ‘भारत’, ‘RBI’ आणि ‘५००’ असे लिहिलेले असते. नोट हलवली की या धाग्याचा रंग हिरव्या रंगातून निळा दिसतो.
-नोटेच्या उजव्या बाजूला लहान आकारात ‘५००’ लिहिलेले असते.
-दृष्टिहीनांसाठी महात्मा गांधींची प्रतिमा, अशोक स्तंभ आणि ओळख चिन्ह उभट स्वरूपात असतात.
– क्रमांक पॅनेलमध्ये डावीकडून उजवीकडे अंकांचा आकार वाढत जातो.
-नोटेचा मूळ रंग दगडी करडा असतो.
-नोट UV light मध्ये तपासल्यास काही सुरक्षा चिन्हे चमकताना दिसतात.
-खरी आणि बनावट नोट ओळखताना कागदाचा दर्जा, छपाईची स्पष्टता आणि उभट छपाई यांकडे विशेष लक्ष द्यावे.
