मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावादरम्यान रुपयाला स्थिरता देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तब्बल १२ अब्ज डॉलर मूल्याच्या सोन्याची विक्री केल्याच्या अफवा बाजारात पसरली होती. मात्र, मध्यवर्ती बँकेने बुधवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बँकेच्या प्रत्यक्ष सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही आणि सध्या ८८०.५२ मेट्रिक टन सुवर्णसाठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने (PIB) देखील या वृत्ताचे फॅक्ट-चेक करत या सोने विक्रीच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले तसेच, नागरिकांनी अशा संवेदनशील आर्थिक बाबींवर फक्त रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुवर्णसाठ्याची सद्यस्थिती काय?
रिझर्व्ह बँकेच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, भारताच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा सातत्याने वाढतो आहे. सप्टेंबर २०२५ अखेर हा वाटा १३.९२ टक्के होता, तो ३१ मार्च २०२६ पर्यंत १६.७० टक्क्यांवर पोहोचला आणि २२ मे २०२६ पर्यंत यात आणखी वाढ होऊन तो १६.८५ टक्के झाला आहे.
३१ मार्च २०२५ रोजी रिझर्व्ह बँकेकडे ८७९.५८ मेट्रिक टन सोने होते, जे विद्यमान वर्षात ३१ मार्च २०२६ पर्यंत ८८०.५२ मेट्रिक टन झाले आहे. म्हणजेच एका वर्षात सोन्याच्या साठ्यात ०.९४ मेट्रिक टनाची किरकोळ वाढ झाली आहे. या एकूण साठ्यापैकी ३१२.३२ मेट्रिक टन सोने ‘इश्यू डिपार्टमेंट’कडे संपत्ती म्हणून आहे, तर उर्वरित ५६८.२० मेट्रिक टन सोने ‘बँकिंग डिपार्टमेंट’च्या अखत्यारीत आहे.
सोन्याच्या मूल्यात वाढ
बँकेच्या तिजोरीतील प्रत्यक्ष सोन्याचे वजन तेवढेच असले, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे कडाडलेले भाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन यामुळे या साठ्याचे मूल्य तब्बल ६३.६ टक्क्यांनी वाढले आहे. ३१ मार्च २०२५ रोजी या साठ्याचे मूल्य ४,३१,६२४ कोटी रुपये होते, ते ३१ मार्च २०२६ रोजी ७,०६,१६२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
रुपयाच्या घसरणीमुळे परकीय गंगाजळीवर
पश्चिम आशियातील (विशेषतः इराण संकट) तणावामुळे जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर वाढले आहेत. यामुळे देशाचे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्ची पडत असून व्यापार तूट वाढली आहे. याचा थेट फटका भारतीय रुपयाला बसला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी प्रतिडॉलर ८९.९८ वर असलेला रुपया २० मे २०२६ रोजी ९६.८६ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यंदाच्या वर्षात रुपयात तब्बल ७ टक्क्यांची घसरण झाली असून, आशियातील सर्वात स्थिर समजले जाणारे चलन आता कमकुवत कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक बनले आहे.
रिझर्व्ह बँकेची बाजारातील मध्यस्थी
रुपयाची ही घसरण रोखण्यासाठी आणि डॉलरच्या तुलनेत बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला सातत्याने परकी चलन गंगाजळीतून डॉलरची विक्री करावी लागते आहे. परिणामी, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ७२८.४९ अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकावर असलेला परकी चलन साठा, २२ मे संपलेल्या आठवड्यात ७.५१ अब्ज डॉलरने घटून ६८१.३८४ अब्ज डॉलरपर्यंत खाली आला आहे.
सोने साथ नक्की किती? (काही रंजक तुलना)
रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदानुसार, बँकिंग विभागातील सोन्याचे मूल्य ७,०६,१६२ कोटी रुपये आहे. हा आकडा एवढा मोठा आहे की यामध्ये देशातील अनेक मोठ्या गोष्टी सहज सामावून जाऊ शकतात:
- महाराष्ट्राच्या संपूर्ण अर्थसंकल्पापेक्षा जास्त: वर्ष २०२६-२७ साठी महाराष्ट्राचा एकूण अर्थसंकल्प सुमारे ६ ते ६.५ लाख कोटींच्या घरात असण्याचा अंदाज आहे. म्हणजेच, रिझर्व्ह बँकेच्या फक्त एका विभागातील सोन्याच्या मूल्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा वर्षभराचा खर्च सहज भागवला जाऊ शकतो.
- देशातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची तुलना: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (सुमारे ५५,००० कोटी रुपये) सारखे १२ पेक्षा जास्त महामार्ग या पैशातून एकाच वेळी बांधता येतील.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसारखे (सुमारे १.१ लाख कोटी रुपये) ६ हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण करता येतील.
प्रत्येक भारतीयाला ५००० रुपये
रिझर्व्ह बॅकेकडील सोने खरेच विकल्यास आणि त्यातील निधी १४० कोटी भारतीयांना वाटायचे ठरल्यास देशातील प्रत्येक नागरिकाला (१४० कोटी लोकसंख्या गृहीत धरल्यास) थेट बँकेत पैसे द्यायचे ठरवल्यास प्रत्येकाच्या खात्यात अंदाजे ५,००० रुपये जमा करता येतील.
वरील रंजक तुलना केवळ रिर्व्ह बँकेकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य लक्षात यावे यासाठी केले आहे. प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेकडे सोने देशाच्या आणीबाणीच्या वेळी किंवा प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्यासाठी असते.
