लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : देशाच्या परकीय गंगाजळीत २२ मे अखेरीस संपलेल्या आठवड्यात ७.५१ अब्ज डॉलरची घट होऊन ती ६८१.३८ अब्ज डॉलरवर आली आहे. याचवेळी सरत्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेचा परकीय चलन व्यवहारातील नफा ५२ टक्क्यांनी १.६९ लाख कोटी रुपयांवर (१७.७० अब्ज डॉलर) पोहोचला आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, देशाची परकीय गंगाजळी २७ फेब्रुवारीअखेर संपलेल्या आठवड्यात ७२८.४९ अब्ज डॉलर या उच्चांकी पातळीवर होती. त्यानंतर पश्चिम आशियातील युद्ध सुरू झाल्यापासून सातत्याने रुपयात घसरण सुरू आहे. ही घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून परकीय चलन बाजारपेठेत डॉलरची विक्री सुरू आहे. त्यामुळे परकीय चलन गंगाजळीत घट झालेली आहे. याचाच परिणाम होऊन २२ मेअखेरीस संपलेल्या आठवड्यात परकीय चलन गंगाजळीत ७.५१ अब्ज डॉलरची घट झाली. त्याआधीच्या आठवड्यात परकीय गंगाजळीत ८.०९ अब्ज डॉलरची घट होऊन ती ६८८.८९ अब्ज डॉलरवर आली होती. देशातील सोन्याचा साठ्याचे मूल्य २२ मेअखेरीस संपलेल्या आठवड्यात ४.५३ अब्ज डॉलरने घटून ११४.७८ अब्ज डॉलरवर आले आहे.

रिझर्व्ह बँकेने सरत्या आर्थिक वर्षात परकीय चलन व्यवहारांतून १.६९ लाख कोटी रुपये कमावल्याचे वार्षिक अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार, परकीय चलन बाजारातील रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक आपल्या गंगाजळीतील डॉलरची विक्री करते. यातून रिझर्व्ह बँकेला फायदा होतो. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बँकेला डॉलर विक्रीतून १.११ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला होता. सरत्या आर्थिक वर्षात त्यात ५२ टक्क्यांनी वाढ होऊन हा फायदा १.६९ लाख कोटी रुपये झाला आहे.

सरकारला २.८७ लाख कोटींचा लाभांश

रिझर्व्ह बँकेने सरत्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला २.८७ लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. रिझर्व्ह बँकेला झालेल्या नफ्यातील काही हिस्सा आपत्कालीन स्थितीसाठी बाजूला ठेवून उरलेल्या हिश्श्यातून सरकारला लाभांश दिला जातो. यंदा मार्चअखेरपर्यंत रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद २०.६१ टक्क्यांनी विस्तारून ९१.९७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.