RBI Governor Sanjay Malhotra Fintech Warning : भारतात ‘डेटा’ सुरक्षा हा दिवसेंदिवस गंभीर मुद्दा होत चालला आहे. त्यातही तो एखाद्याचा वैयक्तिक वित्तीय डेटा असेल तर त्याला अधिक महत्त्व प्राप्त होते. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी फिनटेक कंपन्यांना इशारा दिला आहे. फिनटेक क्षेत्रातील कंपन्यांनी ग्राहकांच्या वैयक्तिक व वित्तीय डेटाला केवळ व्यवसायाची मालमत्ता किंवा नफ्याचे साधन न मानता एक ‘विश्वासू जबाबदारी’ समजून हाताळले पाहिजे, अशी सक्त ताकीद आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. मुंबईत पार पडलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये ते बोलत होते.

भारताची जागतिक झेप आणि स्थान

सध्या भारतीय फिनटेक क्षेत्र जगभरात तिसऱ्या क्रमांकावर असून, देशात तब्बल ३० युनिकॉर्न कंपन्या कार्यरत असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले. जागतिक वित्तीय परिसंस्थेत भारताचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, आगामी काळात जागतिक वित्तीय रचनेला आकार देण्यासाठी भारत एक विश्वासू भागीदार म्हणून उदयाला येत आहे. ‘युनायटेड लेंडिंग इंटरफेस’ सारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशात आर्थिक समावेशकता वेगाने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या स्वनियामक संघटनेला मंजुरी

फिनटेक क्षेत्राच्या शिस्तीसाठी व नियमनासाठी रिझर्व्ह बँकेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. ‘युनायटेड फिनटेक फोरम’ या संस्थेला वित्तीय क्षेत्राची दुसरी स्वनियामक संघटना म्हणून आरबीआयने मंजुरी दिल्याची घोषणा गव्हर्नर मल्होत्रा यांनी केली. याआधी ‘फिनटेक असोसिएशन फॉर कन्झ्युमर इम्पॉवरमेंट’ या संस्थेला पहिली एसआरओ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय, वित्तीय बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी कंपन्यांच्या रोख्यांचे टोकनायझेशन आरबीआय आणि सेबीतर्फे संयुक्तपणे सुरू करण्यात येत असल्याची मोठी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

वित्तीय क्षेत्राच्या भविष्यातील विकासात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासोबतच ग्राहकांच्या सुरक्षेला आणि डेटा प्रायव्हसीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज या संपूर्ण परिषदेत प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आली.

डेटा सुरक्षा का महत्त्वाची?

डिजिटल युगात डेटासुरक्षा केवळ तांत्रिक गरज नसून ती वापरकर्त्यांच्या आर्थिक आणि वैयक्तिक सुरक्षिततेचा कणा आहे. सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डेटा संरक्षण अत्यावश्यक झाले आहे.