Inflation shot up : जशी भीती व्यक्त केली जात होती, अगदी त्याप्रमाणेच सर्वसामान्य ग्राहक, पगारदारांची चिंता वाढेल असे गंभीर वळण परिस्थितीने घेतले आहे. भारतातील किरकोळ महागाई दर जूनमध्ये ४.३८ टक्क्यांपर्यंत वाढला, असे सरकारी आकडेवारीतून सोमवारी स्पष्ट झाले. यामुळे १७ महिन्यांत प्रथमच रिझर्व्ह बँकेसाठी सहनशील असलेल्या ४ टक्क्यांच्या लक्ष्य पातळीला या दराने ओलांडले आहे. या आकड्यांमागील अधिक गंभीर बाब अशी की, व्याजदर वाढीच्या चक्रासाठी मार्ग मोकळा करणारा हा संकेत मानला जात आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर बेतलेला हा किरकोळ महागाई दराचा आकडा अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा काहीसा जास्तच असून, जानेवारीमध्ये भारताने ग्राहक किंमत निर्देशांकाच्या गणनेत सुधारणा केल्यापासून महागाई दराची चढती भाजणी सुरू राहत त्याने आता सर्वोच्च स्तर गाठला आहे. देशाची मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँकेने जूनमध्ये आपला प्रमुख व्याजदर ५.२५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला. परंतु पुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या दबावांच्या दूरगामी परिणामांवर लक्ष ठेवून, आर्थिक वर्षासाठीचा महागाई दराचा अंदाज मात्र पूर्वीच्या ४.६ टक्क्यांवरून ५.१ टक्क्यांपर्यंत वाढवला.
इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेला पुरवठ्यातील व्यत्यय आणि मोसमी पावसाला झालेला विलंब यांमुळे इंधन आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्या, ज्यामुळे महागाई दरातही वाढ झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे मध्यंतरीच्या तात्पुरत्या युद्ध विरामानंतर, रविवारपासून अमेरिका आणि इराणच्या सैन्यामध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे जोरदार हल्ले पुन्हा सुरू झाले असून, महत्त्वाचे म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याचे जाहीर केले गेले आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार असून, त्याचा पुरवठा पुन्हा मोठ्या प्रमाणात बाधित होण्याची भीती आहे.
सरलेल्या मे महिन्यात आयात होणाऱ्या खनिज तेलाच्या किमती कडाडल्यामुळे, सरकारी मालकीच्या इंधन विक्रेत्या कंपन्यांनी चार वेळा दरवाढ केली, ज्यामुळे जूनमध्ये वाहतूक क्षेत्रातील महागाई ४.३१ टक्क्यांपर्यंत वाढली, जी मे महिन्यातील १.७५ टक्क्यांच्या वाढीपेक्षा अधिक जलद होती.
मंदावलेल्या पावसाच्या सरींमुळे अन्नधान्याची महागाई मे महिन्यातील ४.७८ टक्क्यांवरून जूनमध्ये ५.३२ टक्क्यांपर्यंत वाढली. भारतात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे तुटीचा पाऊस आणि पीक उत्पादनात व्यत्यय आल्यास किमतींवरील दबाव पुन्हा वाढू शकतो. देशातील शेती आजही मान्सूनवरच अवलंबून असून, जवळपास निम्मी शेतजमीन सिंचनाविना आहे. लाखो लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने, एकंदरीत कृषी व ग्रामीण उत्पन्नासाठी पाऊस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
आखातातील संघर्ष पुन्हा वाढण्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या मासिक अहवालात केंद्र सरकारने म्हटले होते की, खनिज तेलासह युरियासारख्या जागतिक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे आयातित महागाईचा दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते. परंतु हा दिलासा पुन्हा युुद्ध भडकल्यामुळे हिरावला जाण्याची भीती आहे.
