मुंबई : डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनांमुळे गुरुवारच्या सत्रात रुपया १५६ पैशांनी वधारून ९३.१४ पातळीवर स्थिरावला. वर्ष २०१३ नंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाने नोंदवलेली एका सत्रातील मोठी वाढ आहे.
अस्थिर भू-राजकीय परिस्थिती, परकीय भांडवलाचे निर्गमन, प्रबळ डॉलर आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमती यामुळे रुपया दबावाखाली कायम आहे, असे परकीय चलन विश्लेषकांनी सांगितले. परकीय चलन बाजारात, रुपयाने ९४.६२ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि डॉलरच्या तुलनेत १८८ पैशांची एका सत्रातील मोठी वाढ नोंदवत, ९२.८२ या दिवसातील उच्चांकाला स्पर्श केला. सत्राच्या अखेरीस, रुपया डॉलरच्या तुलनेत ९३.१४ पातळीवर स्थिरावला. अखेर १५६ पैशांनी, म्हणजेच १.६ टक्क्यांनी सावरला.
सोमवारच्या सत्रात रुपयाने ९५ ची पातळी ऐतिहासिक नीचांकी पातळी ओलांडली होती, मात्र त्यानंतर डॉलरच्या तुलनेत तो सावरून ९४.७० वर बंद झाला. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ९४.८४ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर स्थिरावला होता, ज्यामुळे रिझर्व्ह बँकेला चलन बाजारात हस्तक्षेप करणे भाग पडले.
रुपयातील घसरण कशी?
अमेरिका-इराण युद्धाला सुरुवात झाल्यापासून, २८ फेब्रुवारी २०२६ पासून रुपयाचे मूल्य ४ टक्क्यांहून अधिक घसरले आहे. मार्च २०२६ मध्ये सरलेल्या आर्थिक वर्षात, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात सुमारे १० टक्क्यांची घसरला आहे.
रिझर्व्ह बँकेने बँकांवर लादलेल्या नियामक निर्बंधांमुळे, रुपयाने गुरुवारच्या सत्रात १२ वर्षांतील सर्वात मोठी वाढ नोंदवली. नियामक आवश्यकतांचे पालन करण्यासाठी डॉलरची विक्री करणे आवश्यक बनले. यामुळे रुपया सकारात्मक कलानिशी व्यवहार करेल अशी अपेक्षा होती तथापि, जागतिक स्तरावरील जोखीम-टाळण्याची वृत्ती आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे रुपयावर उच्च पातळ्यांवर दबाव कायम राहू शकतो, असे मत मिराई ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी व्यक्त केले.
