मुंबई : महागाईचे आव्हान असतानाही, आर्थिक विकासाला चालना म्हणून रिझर्व्ह बँकेने तूर्त व्याजदरात कोणताही बदल करू नये, अशी अपेक्षा स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी बुधवारी व्यक्त केली. मध्यवर्ती बँकेच्या पतधोरण समितीची द्विमासिक बैठक बुधवारपासून सुरू झाली असून, गव्हर्नर संजय मल्होत्रा शुकवारी (५ जून), या तीन दिवस चालणाऱ्या बैठकीचे निर्णय जाहीर करतील शेट्टी म्हणाले, रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवावेत, अशी बाजारातून बहुतांश अपेक्षा आहे.
विकास आणि महागाई हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत. व्याजदरात वाढ न केल्यास स्थिरता स्थापित होऊन विकासदराचे उद्दिष्ट गाठणे आपल्यासाठी सुकर होईल. कर्जाची मागणीतील वाढ ही वार्षिक तुलनेत भक्कम असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीचा यावर पुढे जाऊन कसा परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तरी सध्या तरी सर्वच क्षेत्रांमध्ये कर्ज मागणीच्या संदर्भात अडचण जाणवलेली नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
आगामी बैठकीत ‘रेपो दर’ ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इंधन दरातील वाढ, पुरवठा साखळीत अडथळे आणि रुपयात सुरू असलेली घसरण यांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. प्रामुख्याने बाह्य घटक यासाठी कारणीभूत आहेत. यामुळे रिझर्व्ह बँकेकडून चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज वाढविला जाऊ शकतो आणि विकास दराचे उद्दिष्ट कमी केले जाऊ शकते, असाही मतप्रवाह आहे.
सार्वत्रिक अंदाज यथास्थितीचा अर्थतज्ज्ञ आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींच्या ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेकडून आजमावल्या गेलेल्या मतानुसार, १५ पैकी ११ जणांनी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात बदल होणार नाही, अशी शक्यता वर्तविली. मात्र वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात व्याजदरात वाढ होऊ शकते, असाही बहुतांशांचा अंदाज आहे.
किरकोळ महागाईचा दर अद्याप रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्य पातळीखाली आहे. यामुळे चालू पतधोरणात व्याजदरात वाढ न होण्याची शक्यता आहे. सध्या वित्तीय पातळीवर आव्हानात्मक परिस्थिती आहे. त्यातच व्याजदरात वाढ करून रुपयातील घसरण रोखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संदेश जाऊ नये, याची काळजी मध्यवर्ती बँक घेईल.- प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया
