RBI Reduces Repo Rate To 5.25%: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची म्हणजेच पाव टक्क्यांची कपात करत तो ५.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर नवा रेपो रेट जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी आहे. यातून रिझर्व्ह बँकेच्या अनुकूल भूमिकेचे संकेत मिळतात.

रेपो रेट म्हणजे काय?

जेव्हा जेव्हा आरबीआय रेपो रेट कमी करते, तेव्हा कर्जाचे हप्ते घटतात. रेपो रेट म्हणजे असा व्याजदर ज्यावर बँका आरबीआयकडून कर्ज घेतात. स्वतःसाठी कर्ज स्वस्त झाल्यास बँका हा लाभ ग्राहकांपर्यंतही पोहोचवतात. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्याने, गृहनिर्माण आणि वाहन कर्जांसह किरकोळ कर्जांवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे रेपो रेट कमी झाल्यास बँकांना लिक्विडिटी वाढवण्यासाठी एफडीमध्ये आकर्षक बदल करण्याची गरज भासत नाही.

गृहकर्जाच्या व्याजदरांवर परिणाम

रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्स कपात झाल्यामुळे गृहकर्जाचे व्याजदरही कमी होण्याची शक्यता आहे. अनेक बँकांनी त्यांच्या बेंचमार्क-लिंक्ड कर्ज दरांमध्ये कपात करण्याची घोषणा आधीच केली आहे. याचा अर्थ असा की नवीन कर्जदार आणि फ्लोटिंग रेट गृहकर्ज असलेले कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना रेपो रेट कपातीचा फायदा होईल.

वर्षभरात रेपो रेटमध्ये १.२५ टक्के कपात

‘आरबीआय’कडून २०२५ मध्ये आतापर्यंत रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने या वर्षी फेब्रुवारी ते जून या कालावधीत रेपो रेटमध्ये एकूण १ टक्के कपात केली होती. ऑगस्ट आणि ऑक्टोबर या कालावधीत रेपो रेट ५.५ टक्के स्थिर ठेवण्यात आला होता.

महागाईचा अंदाज २.६ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी

आरबीआय ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा महागाईचा अंदाज २.६ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​म्हणाले की, “उत्पादन व्यवहारांमध्ये सुधारणा होत आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये स्थिर वाढ दिसून येत आहे. त्यामुळे पतधोरण समितीने चलनविषयक धोरणाच्या तटस्थ भूमिकेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.”