वृत्तसंस्था, मुंबई : प्लास्टिकपासून तयार करण्यात येणाऱ्या पॉलिमर नोटांचे आकारमान सध्या चलनात असलेल्या नोटांप्रमाणेच ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. एटीएममध्ये या नोटा स्वीकारण्यासाठी यंत्रणेत बदल करावे लागल्यास बँकांना मोठा खर्च करावा लागू शकतो. हा खर्च टाळण्यासाठी नोटांच्या आकारमानात बदल न करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांचा प्रायोगिक वापर १ एप्रिल २०२७ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
नोटांचे आकारमान बदलल्यास एटीएममधील रोख रक्कम वितरित करणाऱ्या कॅसेटमध्ये बदल करणे, सेन्सर अद्ययावत करणे आणि यंत्रांचे पुनर्समायोजन करण्यासाठी अभियंत्यांची मदत घ्यावी लागते. यासाठी बँकांना मोठा खर्च करावा लागतो. यापूर्वी १०० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणताना देशभरातील सुमारे दोन लाख ४० हजार एटीएममध्ये आवश्यक बदल करण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च आला होता.
एका सरकारी बँकेकडे आठ हजार ५०० एटीएम असल्यास प्रत्येक एटीएमच्या पुनर्समायोजनासाठी अडीच लाख रुपये खर्च गृहीत धरल्यास सुमारे २१.२५ कोटी रुपयांचा खर्च टाळता येऊ शकतो. सुरुवातीच्या प्रायोगिक टप्प्यात पॉलिमर नोटांचे वितरण बँकांच्या शाखांमधून करता येईल. त्यामुळे एटीएमच्या यंत्रणेत तातडीने बदल करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.
सहा कंपन्यांकडून निविदा
रिझर्व्ह बँकेच्या पूर्ण मालकी असलेल्या रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (बीआरबीएनएमपीएल) या कंपनीने पॉलिमर नोटांसाठी आवश्यक साहित्य खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत सहा कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. त्यामध्ये भारतातील यूफ्लेक्स आणि अमेरिकेतील स्पेक्ट्रा सिस्टिम्स यांच्या भागीदारीचाही समावेश आहे. या निविदेद्वारे ६८ हजार रिम्स बायअॅक्सिअली ओरिएंटेड पॉलीप्रॉपिलीन (बीओपीपी) साहित्य खरेदी केले जाणार आहे. हे साहित्य १० आणि २० रुपयांच्या नोटांसाठी प्रत्येकी ३४ हजार रिम्स या प्रमाणात विभागले जाणार आहे. नोटांच्या छपाईसाठी आवश्यक रंगाचा एकसमान थर आणि शाई योग्य प्रकारे चिकटण्यासाठी अँटी-स्टॅटिक कोटिंग असणे आवश्यक आहे. तसेच या साहित्यामध्ये प्राणिजन्य चरबी किंवा त्यापासून मिळवलेले डीएनए नसावे, अशी अटही निविदेत घालण्यात आली आहे.
कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ऑगस्टमध्ये पॉलिमर नोटांबाबत माहिती देताना या नोटा कागदी नोटांपेक्षा दोन ते चार पट अधिक काळ टिकू शकतात, असे सांगितले होते. मात्र, भारतीय हवामान आणि प्रत्यक्ष वापराच्या परिस्थितीत या नोटांची कामगिरी तपासल्यानंतरच देशभरात त्यांचा वापर करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारने १० आणि २० रुपयांच्या प्रत्येकी एक अब्ज पॉलिमर नोटांच्या चाचण्यांना मंजुरी दिली आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड आणि सिंगापूर यांसारख्या देशांमध्ये यापूर्वीच पॉलिमर नोटांचा वापर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने १९८८ मध्ये सर्वप्रथम पॉलिमर चलन आणले होते.
