मुंबई: अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि नक्कल शक्य नसणाऱ्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रिझर्व्ह बँकेने या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे. अशा नोटांचे उत्पादक शोधण्याची प्रक्रिया तिच्या चलन मुद्रण विभागाने शुक्रवारपासून (१७ जुलै) सुरू देखील केली आहे. यामुळे भारतीयांच्या खिसे-पाकिटातील कागदी नोटांचा काळ संपला आणि त्यांची जागा लवकरच प्लास्टिकच्या नोटा घेतील.रिझर्व्ह बँकेची नोटा छापणारी उपकंपनी असलेल्या ‘भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड’ने जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट उत्पादक शोधण्यासाठी आणि पारदर्शक पद्धतीने त्याची निवड केली जाण्यासाठी जागतिक निविदा प्रक्रिया सुरू केली आहे, असे ‘एएनआय’ने वृत्त दिले आहे.

याद्वारे भारतीय नोटांच्या छपाईसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह कच्चा माल आणि तंत्रज्ञान जागतिक बाजारातून मिळविला जाणार आहे. मुख्यत्वे ‘ओपॅसिफाईड पॉलिमर सबस्ट्रेट शीट्स’ अर्थात पारदर्शक पॉलिमर कागदाची पाने पुरवण्यासाठी निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत.

बोली लावणारे देशांतर्गत किंवा जागतिक कोणीही असू शकतील. तसेच त्यांचे तंत्रज्ञान सहयोगी, संयुक्त उपक्रम भागीदार किंवा उपकंपन्या देशी किंवा आंतरराष्ट्रीय असू शकतील. मात्र पात्र ठरण्यासाठी त्यांच्याकडे किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. हा अनुभव एखाद्या मध्यवर्ती बँकेला किंवा नोट/सुरक्षा छपाई संस्थेला सुरक्षा वैशिष्ट्ये असलेल्या पॉलिमर सबस्ट्रेटचा पुरवठा केल्याचा असणे आवश्यक करण्यात आले आहे.

शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या या प्रक्रियेतून, ६८,००० रीम (प्रत्येकी ५०० पानांचे) पॉलिमर सबस्ट्रेटची अंदाजित मागणीची पूर्तता करणारी स्वारस्य पत्र मागवण्यात आली आहेत. यात दोन वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटांसाठी प्रत्येकी ३४,००० रीमची मागणी केली गेली आहे. या साहित्यामध्ये चित्रासह स्पष्ट दिसणारी पारदर्शक खिडकी (क्लीयर विंडो), धातूचे अंक (मेटॅलिक न्यूमरल), चुंबकीय छद्म धागा (मॅग्नेटिक स्यूडो थ्रेड), छायाचित्र (शॅडो इमेज) आणि सप्तरंगी नक्षी (इरिडेसंट पॅटर्न) यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे. जेणेकरून ते रिझर्व्ह बँकेच्या उपकंपन्यांच्या अर्थात ‘बीआरबीएनएमपीएल’ आणि ‘एसपीएमसीआयएल’ यांच्या मुद्रणलयांमध्ये छपाईसाठी योग्य ठरेल.

या क्षेत्रातील जाणकार सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात १० आणि २० रुपयांच्या लहान मूल्यांच्या नोटा प्लास्टिक (पॉलिमर) स्वरूपात आणल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच, या नोटांच्या छपाईसाठी वापरली जाणारी शाई देखील सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन विशेष रीतीने तयार करण्यात आली आहे. या प्रक्रियेतून निवड करण्यात आलेल्या सामग्रीच्या प्रत्यक्ष वापराच्या चाचण्या यशस्वी झाल्या की, त्यानंतरच्या निविदांमध्ये विविध मूल्यांच्या नोटांसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाण्याची शक्यता मध्यवर्ती बँकेने व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, या स्वारस्य पत्रामध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. बोली लावणाऱ्या कंपन्यांचे चीन किंवा पाकिस्तानमधील कामकाज भारताशी संबंधित व्यवसायापासून पूर्णपणे वेगळे असेल, हे खात्री पटेल असे सिद्ध करावे लागेल. त्यांनी या देशांतून कच्चा माल मिळवू नये आणि चीन किंवा पाकिस्तानमध्ये कोणत्याही क्षमतेने काम केलेल्या कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये.

भारताशी सीमा भिडलेल्या असलेल्या कोणत्याही देशांमधील संस्थांना पात्र ठरण्यासाठी केंद्राच्या ‘डीपीआयआयटी’ विभागाकडे नोंदणी असणे आवश्यक ठरेल.