मुंबई: रिझर्व्ह बँक येत्या १३ मार्चला बँकिंग प्रणालीमध्ये ५०,००० कोटी रुपयांचा निधी ओतणार आहे. सरकारी रोख्यांची खुल्या बाजारात खरेदी (ओपन मार्केट ऑपरेशन – ओएमओ) करून ही तरलता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १३ मार्चला सकाळी ९.३० ते १०.३० या दरम्यान हा रोखे लिलाव होईल, असे मध्यवर्ती बँकेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. हा लिलाव ६ मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या १ लाख कोटी रुपयांच्या जी-सेक खरेदीचा एक भाग आहे.

रिझर्व्ह बँक ६.४५ टक्के जीएस २०२९, ७.९५ टक्के जीएस २०३२, ६.७९ टक्के जीएस २०३४, ६.६४ टक्के जीएस २०३५, ७.४१ टक्के जीएस २०३६, ७.६२ टक्के जीएस २०३९ आणि ७.०६ टक्के जीएस २०४६ यासारख्या रोख्यांची खरेदी करेल. या आधी पहिला लिलाव ९ मार्च रोजी पूर्ण झाला, ज्यामध्ये रिझर्व्ह बँकेने जी-सेक खरेदीद्वारे बँकिंग प्रणालीमध्ये ५०,००० रुपये ओतले. त्यामुळे एकंदर १ लाख कोटी रुपयांची तरलता बँकांना उपलब्ध होईल. सध्या, बँकिंग प्रणालीमध्ये सुमारे २.७४ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त तरलता असल्याचा अंदाज आहे.

या महिन्याच्या मध्याला (१५ मार्च) होणारा अग्रिम कराच्या शेवटच्या हप्त्याचा भरणा आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) देयकांमुळे बँकिंग व्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात निधी बाहेर पडण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर ही रोखे लिलावाची (ओएमओ) घोषणा करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, कॅलेंडर वर्ष २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत बँकेने सरकारी ओएमओद्वारे ३ लाख कोटी रुपयांची तरलता बँकांना प्रदान केली आहे.