लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य खत उत्पादक कंपनी ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’ (आरसीएफ) कंपनीने नवीन भांडवल उभारणीसाठी तयारी सुरू केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने ‘फॉलो-ऑन पब्लिक ऑफर’ म्हणजेच ‘एफपीओ’च्या माध्यमातून सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नवीन समभागांची विक्री करून हा निधी उभा केला जाणार आहे.
आरसीएफने नियामक दाखल केलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाने ७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मात्र, या प्रस्तावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला आता भागधारक, केंद्रीय खत मंत्रालय आणि गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात दिपम यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. सरकारकडून मिळणाऱ्या मंजुरीनंतर या एफपीओचे निश्चित वेळापत्रक आणि शेअरच्या किमतीचा पट्टा जाहीर केला जाईल. सध्या खत क्षेत्रातील शेअर्सना असणारी मागणी पाहता, या एफपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्यवसायाच्या विस्तारासह ‘हरित ऊर्जे’वर भर
या १,५०० कोटी रुपयांच्या निधीचा वापर कंपनीच्या भविष्यातील धोरणात्मक उद्दिष्टांसाठी आणि विस्तार योजनेसाठी केला जाणार आहे. केवळ खत व्यवसायापुरते मर्यादित न राहता बदलत्या काळाची गरज ओळखून कंपनीने आपल्या मूळ उद्दिष्टांमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचे निश्चित केले आहे.
कंपनी आता नूतनीकरणक्षम ऊर्जा, कचरा व्यवस्थापन आणि ॲग्रो-केमिकल्स या नवीन क्षेत्रांमध्ये पाय घट्ट रोवणार आहे. या सुधारणांमुळे कंपनीला भविष्यात हरित ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांमध्ये थेट गुंतवणूक करण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा होणार आहे.
आरसीएफची बाजारातील स्थिती
भारतीय खत बाजारात ‘आरसीएफ’ ही मोठी ‘नवरत्न’ सरकारी कंपनी मानली जाते. कंपनीचे मुंबईतील ट्रॉम्बे आणि रायगड जिल्ह्यातील थळ येथे दोन अत्याधुनिक आणि मोठे उत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत. युरिया, संमिश्र खते, बायो-फर्टिलायझर्स, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विविध औद्योगिक रसायनांच्या उत्पादनात कंपनीचा मोठा वाटा आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीने तब्बल ५,५८१ कोटी रुपयांच्या विक्रीसह १८७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा दर्शवतो. सध्या शेअर बाजारात कंपनीच्या शेअरची किंमत १३० ते १३३ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
‘ट्रॉम्बे’ युनिटला नवीन नेतृत्व
निधी उभारणीच्या या मोठ्या निर्णयासोबतच कंपनीने व्यवस्थापनातही महत्त्वाचे बदल केले आहेत. कंपनीच्या ‘ट्रॉम्बे’ युनिटच्या कार्यकारी संचालक पदी संजीव हरळीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जुलै पासून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. आगामी एफपीओ आणि उत्पादन प्रकल्पांचे आधुनिकीकरण या पार्श्वभूमीवर या नेतृत्वाकडे बाजारपेठेचे विशेष लक्ष असणार आहे.
