Reliance Bombay Creamery Ice Cream Launch : टेलिकॉम आणि थंड पेय क्षेत्रातील जोरदार यशानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने देशातील आईस्क्रीम मार्केटमध्ये एन्ट्री केली आहे. ‘रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स’ने आपली नवी आईस्क्रीम ब्रँड ‘बॉम्बे क्रीमरी’ बाजारात उतरवण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, जिओ आणि कॅम्पा कोलासाठी वापरण्यात आलेली मार्केटींग स्ट्रॅटेजी आईस्क्रीमसाठी वापरण्यात आली आहे. रिलायन्सच्या आगमनामुळे ‘अमुल’सारख्या मोठ्या ब्रँड्सना भविष्यात तगडी स्पर्धा मिळणार आहे. ‘बॉम्बे क्रीमरी’च्या घोषणेनंतर लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँडचे शेअर्स गडगडले आहेत.
१० रुपयांची आक्रमक मार्केटींग
रिलायन्सने यावेळीही प्राइस गेम खेळत स्पर्धकांना मोठा धक्का दिला आहे. अवघ्या १० रुपयांमध्ये कप, कोन आणि स्टिक आईस्क्रीम उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने सुरुवातीला पश्चिम भारतातून या ब्रँडचा शुभारंभ केला असून, लवकरच देशभरात याचा विस्तार केला जाणार आहे.
क्वालिटी वॉल्स ११ टक्क्यांनी घसरला
रिलायन्सच्या या ‘प्राईस वॉर’च्या बातमीचा थेट फटका शेअर बाजारात प्रतिस्पर्धी कंपन्यांना बसला. मुंबई शेअर बाजारात क्वालिटी वॉल्सचे समभाग ३ टक्क्यांनी घसरून ४३ रुपयांवर आले. सलग सातव्या सत्रात या शेअरमध्ये घसरण सुरू असून, आतापर्यंत तो ११ टक्क्यांनी खाली आला आहे.
अमूलला थेट आव्हान
सध्या झेप्टो, इन्स्टामार्ट, ब्लिंकीटसारख्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर अमूलचे सर्वात स्वस्त आईस्क्रीम स्टिक २० रुपयांना मिळते. रिलायन्सने १० रुपयांत ‘बॉम्बे क्रीमरी’ लाँच करून ही सुरुवातीची किंमत थेट अर्ध्यावर आणली आहे. यापूर्वी रिलायन्सने ‘कॅम्पा’ सॉफ्ट ड्रिंक १० रुपयांत आणून पेप्सी आणि कोका-कोलासारख्या जागतिक दिग्गजांना मोठा धक्का दिला होता. कॅम्पाने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ४,७०० कोटी रुपयांची विक्री नोंदवत चौथ्या क्रमांकाचे ब्रँड स्थान मिळवले आहे. आता तोच फॉर्म्युला आईस्क्रीम बाजारात वापरला जात आहे.
गुणवत्तेशी तडजोड नाही
स्वस्त उत्पादन विकत असलो तरी त्याच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे संचालक टी. कृष्णकुमार यांनी स्पष्ट केले. “आम्ही केवळ आईस्क्रीम बाजारात येत नसून, या कॅटेगरीतील सर्व उत्पादने बाजारात आणणार आहोत. शुद्ध दुधाच्या क्रिमपासून तयार केलेले हे आईस्क्रीम प्रत्येक भारतीय कुटुंबाला परवडणाऱ्या दरात उत्तम चव देईल.”
भारतातील आईस्क्रीम बाजार किती मोठा?
भारत उष्णकटिबंधीय देश असून इथं थंड पेय आणि आईस्क्रीम उद्योगाची मोठी बाजारपेठ आहे. एक्सपर्ट मार्केट रिसर्चच्या अहवालानुसार, देशातील आईस्क्रीम उद्योग १५% चक्रवाढ दराने वाढून २०३५ पर्यंत सुमारे १.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. वॅनिला आणि चॉकलेटच्या पुढे जाऊन आता सॉल्टेड कॅरॅमल, माचा, तिरामिसू यांसारख्या प्रीमियम फ्लेव्हर्सची मागणी वाढते आहे. लहान शहरांमध्ये अजूनही ब्रँडेड आईस्क्रीमचा वापर मर्यादित असल्याने तेथे नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याची मोठी संधी आहे.
मोठ्या ब्रँड्ससोबत टक्कर
देशातील किरकोळ बाजारात रिलायन्सचे मोठं जाळं आहे. रिलायन्सने यापूर्वीच आपल्या दुकानांच्या नेटवर्कचा वापर करून कॅम्पाचे फ्रीझर्स देशभरात पोहोचवले आहेत. याच विशाल रिटेल नेटवर्कचा वापर आता ‘बॉम्बे क्रीमरी’साठी केला जाईल. तज्ज्ञांच्या मते, अमूल, वाडीलाल, मदर डेअरी, क्वालिटी वॉल्स आणि गो झिरो, नोटो सारख्या नवीन ब्रँड्सना आता रिलायन्सच्या या स्वस्त आणि आक्रमक मार्केटींगचा सामना करण्यासाठी आपल्या धोरणांचा पुनर्विकार करावा लागणार आहे.
