Reliance NK Holdings Bid SevenHills Hospital Mumbai: सेव्हनहिल्स हेल्थकेअरचे मुंबईतील प्रसिद्ध सेव्हनहिल्स हॉस्पिटल खरेदी करण्यासाठी रिलायन्स समूहाशी संबंधित एनके होल्डिंग्ज आणि ज्युपिटर हॉस्पिटल स्पर्धेत आहेत. या प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्तींच्या हवाल्याने इकोनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे. मुंबईतील सेव्हनहिल्स हॉस्पिटल सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चनचा जन्म तिथे झाला, तेव्हा चर्चेत आले होते.

रिलायन्स समूहाशी संबंधित एनके होल्डिंग्ज कंपनीने सेव्हनहिल्स हेल्थकेअर खरेदी करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला आहे, असे उपरोक्त नमूद केलेल्या व्यक्तींनी सांगितले. दोन्ही बोली लावणाऱ्या कंपन्यांनी सुमारे ४५० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे, परंतु खरेदी रक्कम देण्याच्या पद्धतींमध्ये फरक आहे.

ज्युपिटरने दिवाळखोरी न्यायालयाच्या मंजुरीनंतर ३० दिवसांच्या आत ४५० कोटी रुपयांची खरेदी रक्कम देण्याचा प्रस्ताव दिला आहे, तर रिलायन्सशी संबंधित एनके होल्डिंग्जने पाच वर्षांच्या कालावधीत ४५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

सेव्हनहिल्स हेल्थकेअरच्या मुंबईतील हॉस्पिटलचा मुंबई महानगरपालिकेशी जमिनीच्या नुकसानभरपाईवरून दीर्घकाळापासून कायदेशीर वाद सुरू आहेत. मार्च २०१८ मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात प्रकरण दाखल झाल्याने आणि या वादांमुळे रुग्णालयाच्या विक्रीत अडथळा येत आहे.

सेव्हनहिल्सच्या मालकीचे एक हॉस्पिटल विशाखापट्टणमध्ये होते. तर दुसरे मुंबईत आहे. सध्या सुरू असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया जलद करण्यासाठी, दिवाळखोरी न्यायालयाने कर्जदारांना ही रुग्णालये स्वतंत्रपणे विकण्याची परवानगी दिली आहे.

जुलै २०२४ मध्ये, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने एमजीएम हेल्थकेअरला सेव्हनहिल्सच्या मालकीचे विशाखापट्टणम येथील रुग्णालय १७१ कोटी रुपयांना खरेदी करण्यास मान्यता दिली होती. मुंबईतील रुग्णालयाचे भवितव्य अद्यापही अनिश्चित आहे, कारण मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयाकडे १४०.८ कोटी रुपयांच्या थकलेल्या भाड्याची मागणी केली आहे.

कोविड-१९ नंतर मॅक्स हेल्थकेअर आणि केआयएमएस हॉस्पिटलसह अनेक हेल्थकेअर कंपन्यांनी सेव्हनहिल्स खरेदी करण्यात रस दाखवला होता.