मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सरलेल्या जून तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदवत विक्रमी २३,१९६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा शुक्रवारी जाहीर निकालांद्वारे नोंदवला. अलीकडच्या काळात ऊर्जा बाजारातील सर्वात मोठ्या धक्क्याचा सामना समूहाला करावा लागला, तरी तेल ते रसायन या कंपनीच्या प्रमुख व्यवसायासह, डिजिटल सेवा आणि किरकोळ विक्री (रिटेल) यामध्ये दोन अंकी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळालेल्या विशेष लाभाचा परिणाम एकूण नोंदवलेल्या कमाईवर झाला असूनही, कंपनीने विक्रमी परिचालन नफा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही निव्वळ नफा नोंदवला. कंपनीच्या विविध क्षेत्रांमधील व्यवसायांच्या दमदार कामगिरीमुळे एकत्रित महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांची वाढ होऊन तो ३.४० लाख कोटी रुपयांवर पोहोचला. तिन्ही व्यवसाय क्षेत्रांनी महसुलात दोन अंकी वाढ दर्शवली. व्याज, कर, घसाऱ्यापूर्व नफा १०.१ टक्क्यांनी वाढून विक्रमी ५४,०६७ कोटी रुपयांवर पोहोचला, तर करपूर्व नफा ८.५ टक्क्यांनी वाढून ३०,६३० कोटी रुपये झाला. करपश्चात नफा ६.१ टक्क्यांनी वाढून २३,१९६ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला.

सरलेल्या जून तिमाहीत कंपनीने ३८,६८२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि भांडवली खर्चासाठी लागणारा निधी हा रोख प्रवाहातून सहजपणे उपलब्ध झाला. जूनच्या अखेरीस कंपनीवरील निव्वळ कर्ज १.२३ लाख कोटी रुपयांवर स्थिर राहिले.

‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ हे वाढीचे प्रमुख चालक ठरले. क्लाउड कम्प्युटिंग, कंटेंट, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि मॅनेज्ड सर्व्हिसेस या सेवांना चालना मिळाल्यामुळे डिजिटल सेवांच्या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाली. ही वाढ मूळ कनेक्टिव्हिटी व्यवसायाच्या वाढीपेक्षा अधिक होती. ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’चा महसूल वाढून ४५,९६१ कोटी रुपये झाला आणि नफ्याचे प्रमाण ५३.३ टक्क्यांपर्यंत वाढले. तिमाहीच्या अखेरीस दूरसंचार व्यवसायाचे ५३.३ कोटी ग्राहक होते.

कंपनीचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.३ टक्क्यांनी वाढून २१५.६ रुपये झाला. विदाचा वापर मजबूत राहिला असून, एकूण ट्रॅफिक मागील वर्षाच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढून ६९ एक्झाबाइट्सवर पोहोचले आहे, असे रिलायन्सने सांगितले. जिओ एअरफायबरने १.४ कोटींहून अधिक ग्राहकांसह जागतिक नेतृत्व कायम राखले आहे, तर कंपनीने गेल्या वर्षभरात ७.३ कोटींहून अधिक ५जी वापरकर्ते आणि ८६ लाख फिक्स्ड ब्रॉडबँड ग्राहक जोडले आहेत.

किरकोळ विक्री (रिलायन्स रिटेल) व्यवसाय विभागाचा महसूल ९०,४०८ कोटी रुपयांवर गेला, जो वार्षिक तुलनेत ७.४ टक्क्यांनी वाढला. तर समूहाच्या महसूलात सर्वाधिक हिस्सा राखणाऱ्या पारंपरिक तेल ते रसायन व्यवसाय विभागाचा महसूल ३०.४ टक्क्यांनी वाढून २०१,८०३ कोटी रुपये नोंदवला गेला.

प्रवर्तकांकडून ९००० कोटी मूल्याची समभाग खरेदी

बाजार भांडवलाच्या दृष्टीने सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवर्तक समूहाने जून तिमाहीत खुल्या बाजारातून समभाग खरेदी करून कंपनीतील हिस्सेदारी सुमारे ०.५ टक्क्यांनी वाढवली आहे. नियामक आकडेवारीनुसार, प्रवर्तक आणि प्रवर्तक समूहाचा हिस्सा जून तिमाहीअखेर ५०.४८ टक्क्यांवर पोहोचला; तीन महिन्यांपूर्वी तो सुमारे ५० टक्के होता. ही खरेदी भांडवली बाजार नियामक सेबीच्या नियमांच्या अधीन राहून करण्यात आली. विश्लेषकांच्या मते, प्रवर्तक समूहाने केलेली ही खरेदी ८,५०० ते ९,००० कोटी रुपयांच्या घरात आहे.