मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (आरआयएल) ४९ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) येत्या १९ जून रोजी आयोजित करण्यात आली असून, २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी लाभांश मिळण्यास पात्र भागधारक निश्चित करण्यासाठी कंपनीने ५ जून ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, एजीएम दुपारी २ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे पार पडणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने यापूर्वी मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ६ रुपयांचा लाभांश जाहीर करण्याची शिफारस केली होती. भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर एजीएमच्या सात दिवसांच्या आत लाभांशाचे वितरण केले जाईल. याशिवाय, एजीएममधील ठरावांवर मतदान करण्यासाठी पात्र भागधारक निश्चित करण्यासाठी १२ जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

मार्च तिमाहीत २०,५८९ कोटींचा निव्वळ नफा

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने २०२५-२६ मध्ये दूरसंचार आणि किरकोळ व्यवसायातील दुहेरी आकडी वाढीच्या जोरावर जवळपास ११.७६ लाख कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न नोंदवले आहे. मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना कंपनीने मार्च २०२६ अखेरच्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा २०,५८९ कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. तिमाहीतील एकूण महसूल १२.९ टक्क्यांनी वाढून ३,२५,२९० कोटी रुपयांवर पोहोचला. ऑइल-टू-केमिकल्स, डिजिटल सेवा आणि रिटेल व्यवसायातील वाढीमुळे महसुलाला चालना मिळाली. या कालावधीत कंपनीचा EBITDA ४८,५८८ कोटी रुपये राहिला.

कंपनीने आपल्या मीडिया आणि मनोरंजन व्यवसाय ‘जिओस्टार’ची कामगिरीही जाहीर केली. या व्यवसायाने तिमाहीत ९,७८४ कोटी रुपयांचे उत्पन्न आणि ४२० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. ‘जिओहॉटस्टार’चे मासिक सक्रिय वापरकर्ते सरासरी ५० कोटींवर पोहोचले, तर दूरचित्रवाणी मनोरंजन क्षेत्रातील प्रेक्षक वाटा ३४.२ टक्के राहिल्याचे कंपनीने म्हटले आहे.

‘जिओस्टार’ची दमदार कामगिरी

या निकालांसोबतच कंपनीने आपल्या ‘जिओस्टार’ (JioStar) या मीडिया आणि मनोरंजन व्यवसायाची आकडेवारीही जाहीर केली. या तिमाहीत जिओस्टारने ९,७८४ कोटी रुपयांचा महसूल आणि ४२० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. या कालावधीत ‘जिओहॉटस्टार’चे (JioHotstar) मासिक सक्रिय वापरकर्ते (MAUs) सरासरी ५० कोटींवर पोहोचले असून, टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रातील प्रेक्षकांचा वाटा (Viewership Share) ३४.२ टक्के इतका राहिला आहे.

कोविड-१९ महामारीच्या काळापासून, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि बाजार नियामक ‘सेबी’च्या (SEBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार रिलायन्सने आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने घेण्याचा पायंडा कायम ठेवला आहे.

जिओच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

रिलायन्स इंडस्ट्रीजची १९ जून रोजी होणारी ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) यंदा विशेष चर्चेत आली असून, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बहुप्रतीक्षित आयपीओबाबत काही महत्त्वपूर्ण संकेत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दूरसंचार क्षेत्रातील मजबूत वाढ, डिजिटल व्यवसायातील वाढती कमाई आणि गुंतवणूकदारांची उत्सुकता पाहता, जिओच्या सूचिबद्धतेच्या रोडमॅपवर कंपनी भूमिका स्पष्ट करू शकते, अशी बाजारात चर्चा आहे.

गेल्या काही वर्षांत रिलायन्स समूहाने जिओला केवळ दूरसंचार कंपनी न ठेवता डिजिटल सेवा, मीडिया, मनोरंजन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या क्षेत्रांत विस्तारले आहे. त्यामुळे जिओचा आयपीओ हा भारतीय भांडवली बाजारातील सर्वात मोठ्या सार्वजनिक प्रस्तावांपैकी एक ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, कंपनीकडून अद्याप आयपीओबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे १९ जूनच्या एजीएममध्ये मुकेश अंबानी कोणते संकेत देतात, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

मुकेश अंबानी काय म्हणाले?

“रिलायन्सच्या विविध व्यवसायांचा विस्तार आणि देशांतर्गत बाजारपेठेवरील मजबूत पकड यामुळे जागतिक स्तरावरील अस्थिर वातावरणातही कंपनीला स्वतःचे स्थान टिकवून ठेवता आले.” – मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज