पीटीआय, नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे ‘ए-’ हे दीर्घकालीन पतमानांकन ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने कायम ठेवले आहे. कंपनीची मजबूत नफाक्षमता, रोकडनिर्मितीची क्षमता आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील उपकंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या सूचिबद्धतेमुळे वाढलेली निधी उभारणीची लवचिकता यांचा विचार करून पतमानांकन कायम ठेवण्यात आले आहे. मानांकनाबाबतचा दृष्टिकोन स्थिर असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

डिजिटल सेवा क्षेत्रात उद्योगाच्या सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढ कायम ठेवताना कंपनी भांडवली खर्च आणि कृत्रिम प्रज्ञा (एआय) पायाभूत सुविधा, विदा केंद्रे तसेच नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या उदयोन्मुख व्यवसायांतील गुंतवणुकीसाठी पुरेशी रोकड निर्माण करेल, असा ‘एस अँड पी’चा अंदाज आहे.

मार्च २०२७ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात (२०२६-२७) रिलायन्सच्या एकत्रित व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्व नफ्यात १९ ते २३ टक्के वाढ होऊन तो २.१५ लाख कोटी ते २.२५ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे. ऊर्जा आणि डिजिटल सेवा हे दोन्ही व्यवसाय समूहाच्या एकूण ईबीआयटीडीएमध्ये प्रत्येकी जवळपास ४५ टक्के योगदान देतील, अशी अपेक्षा आहे.

तेलशुद्धीकरण व्यवसायातून नफावाढीची अपेक्षा

तेल ते रसायने (ओटूसी) हा व्यवसाय रिलायन्सच्या नफावाढीचा प्रमुख आधार ठरण्याची शक्यता आहे. या व्यवसायाच्या व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्व नफ्यात २०२६-२७ मध्ये ३० ते ३५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या शुद्धीकरणाचे प्रमाण कमी होणे आणि पश्चिम आशियातील तेलपुरवठ्यातील व्यत्यय यामुळे एकात्मिक तेलशुद्धीकरण नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत पेट्रोल, गॅसऑइल आणि विमान इंधनाच्या शुद्धीकरणातील नफ्याचे अंतर (क्रॅक स्प्रेड) मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास तिप्पट झाले होते, असे ‘एस अँड पी’ने नमूद केले. त्यामुळे रिलायन्सचा तेलशुद्धीकरण आणि रसायन व्यवसायातील प्रतिपिंप कमाई २०२५-२६ मधील जवळपास १४ डॉलरवरून २०२६-२७ मध्ये सुमारे १८ डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

जिओच्या सूचिबद्धतेचा पतमानांकनाला आधार
रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या डिजिटल सेवा व्यवसायामध्ये १२ ते १४ टक्के वाढ अपेक्षित आहे. ग्राहकसंख्येतील वाढ, प्रति ग्राहक सरासरी महसुलात (एआरपीयू) सुधारणा आणि अधिक ग्राहकांनी प्रीमियम योजनांकडे वळणे यामुळे ही वाढ साध्य होईल. डेटाचा वाढता वापरही याला पूरक ठरेल. मात्र, दूरसंचार दरांमध्ये आणखी वाढ होईल. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या सूचिबद्धतेमुळे रिलायन्सच्या निधी उभारणीच्या स्रोतांमध्ये विविधता येईल आणि विशेषतः डिजिटल पायाभूत सुविधांमधील वाढत्या गुंतवणुकीसाठी भांडवली बाजारातून निधी मिळवणे सुलभ होईल, असे संस्थेने म्हटले आहे.

मानांकन वाढीसाठी कर्जात घट आवश्यक

पुढील १२ ते २४ महिन्यांत रिलायन्स प्रमुख व्यवसायांतील बाजारपेठेतील स्थान कायम ठेवेल, रोकडनिर्मिती वाढवेल आणि वाढत्या भांडवली खर्चाचे व्यवस्थापन करत समायोजित कर्ज-ईबीआयटीडीए गुणोत्तर दोन पटांखाली ठेवेल, या अपेक्षेवर स्थिर दृष्टिकोन आधारित आहे.

कंपनीने आर्थिक धोरणापासून दूर जात नफ्यातील वाढीला पूरक आधार नसताना कर्जाच्या माध्यमातून आक्रमक गुंतवणूक केल्यास पतमानांकनावर दबाव येऊ शकतो. नफा आणि रोकडप्रवाहात सातत्याने घट होऊन समायोजित कर्ज-ईबीआयटीडीए गुणोत्तर दोन पटांपेक्षा लक्षणीयरीत्या वाढल्यास आणि सुधारण्याचा विश्वासार्ह मार्ग दिसत नसल्यास मानांकन घटवले जाऊ शकते.

मानांकनात सुधारणा होण्यासाठी व्यवसायाचा विस्तार, विविधीकरण आणि आर्थिक धोरणातील अधिक सावधगिरी आवश्यक आहे. समायोजित कर्ज-ईबीआयटीडीए गुणोत्तर १.५ पट किंवा त्याखाली येऊन कायम राहिल्यास कंपनीच्या स्वतंत्र पतक्षमतेत सुधारणा होण्याचा विचार केला जाऊ शकतो. नव्या ऊर्जा व्यवसायाचे समूहाच्या एकूण रोकडप्रवाहातील महत्त्वपूर्ण योगदानही मानांकनवाढीस पूरक ठरेल.

मात्र, रिलायन्सच्या परकीय चलनातील पतमानांकनात सुधारणा करण्यासाठी भारताच्या परकीय चलन हस्तांतरण आणि परिवर्तनीयतेसंबंधीच्या मूल्यांकनातही सुधारणा आवश्यक आहे. सध्या हे मूल्यांकन ‘ए-’ आहे. त्यामुळे रिलायन्सच्या पतक्षमतेबरोबरच देशाच्या पतमानांकनाशी संबंधित परिस्थितीही महत्त्वाची ठरेल.

रिलायन्सच्या नफ्यातील वाढ आणि निधी उभारणीच्या विविध स्रोतांमुळे मोठ्या गुंतवणूक कार्यक्रमातील जोखीम कमी होते. मात्र, कर्जाचे प्रमाण, भांडवलाचे वाटप आणि नव्या व्यवसायांमधून मिळणारा परतावा हे कंपनीच्या भविष्यातील पतमानांकनासाठी महत्त्वाचे घटक राहतील, असे ‘एस अँड पी’ने स्पष्ट केले.