Highest Paid CFO in India : आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानामुळे आयटीसह विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू आहे. टेक कंपन्या एआयमध्ये गुंतवणूक वाढवत असल्याने खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे. असे असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली जात आहे. २०२५-२६ (FY26) या आर्थिक वर्षात भारतातील अव्वल कंपन्यांनी आपल्या वित्तप्रमुखांना (CFO -Chief Financial Officer) भरघोस वेतन आणि मानधन दिले आहे. आपण देशात सर्वाधिक पगार घेणाऱ्या टॉप ५ अधिकारी आणि कंपन्यांची माहिती घेऊ.

पहिल्या क्रमांकावर अदानी-रिलायन्स नाही तर ‘लार्सन अँड टुब्रो’!

या यादीत ‘लार्सन अँड टुब्रो’चे सीएफओ आर. शंकर रमण यांनी अव्वल स्थान पटकावले असून, त्यांना आर्थिक वर्ष २०२६ मध्ये तब्बल ५४.०२ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे सीएफओ श्रीकांत व्यंकटाचारी असून त्यांचा पगार १९.९५ कोटी रुपये आहे. अहवालानुसार, कॉर्पोरेट जगतात सीएफओंच्या एकूण वेतनात मूळ पगारापेक्षा परफॉर्मन्स लिंक्ड कमिशन, शेअर्स आणि दीर्घकालीन सवलतींचा वाटा मोठा आहे.

भारतातील सर्वोच्च मानधन घेणारे ‘टॉप-५’ सीएफओ

  1. आर. शंकर रमण (L&T) : ५४.०२ कोटींच्या एकूण वेतनात ४.८४ कोटी रुपये मूळ पगार, ३८.१८ कोटी रुपये कमिशन आणि १०.९९ कोटी इतर भत्त्यांचा यात समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या वेतनात तब्बल ४४.७ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे.
  2. श्रीकांत व्यंकटाचारी (Reliance Industries) : यांच्या १९.९५ कोटींच्या मानधनात १९.४० कोटी पगार व भत्ते आणि ५४.४४ लाख इतर फायदे मिळतात.
  3. अदानी एंटरप्रायझेस : अदानी एंटरप्रायझेसचे सीएफओ जुगेशिंदर सिंग यांना आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ११.४१ कोटी रुपये मिळाले, तर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये त्यांना १०.११ कोटी रुपये मिळाले होते; म्हणजेच त्यांच्या मानधनात १२.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
  4. आयटीसी (ITC) : कंपनीच्या वार्षिक विवरणपत्रानुसार, आयटीसीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी सुप्रतिम दत्ता यांना आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १०.५७ कोटी रुपयांचे एकूण वेतन मिळाले. हे वेतन आर्थिक वर्ष २०२५ मधील १०.०१ कोटी रुपयांच्या तुलनेत अधिक आहे. त्यांना ५.६ टक्क्यांची पगारवाढ मिळाली आहे.
  5. इन्फोसिस : जयेश संघराजका यांना कंपनीने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ९.८३ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मानधनात १२ टक्क्यांनी अधिक वाढ आहे. तसेच, त्यांना ५३,०२० ‘रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स’ देखील देण्यात आले.