मुंबई : भारतीय दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी कंपनी ‘रिलायन्स जिओ’ आता शेअर बाजारात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. जिओच्या बहुप्रतिक्षित प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) पार्श्वभूमीवर कंपनीची आर्थिक कामगिरी, ग्राहकांची संख्या आणि महसुलाचे आकडे समोर आले असून, गुंतवणूकदारांचे याकडे बारीक लक्ष आहे.

कंपनीने आर्थिक आघाडीवर चमकदार कामगिरी केली असली, तरी दूरसंचार क्षेत्रातील एक महत्त्वाचा निकष मानल्या जाणाऱ्या ‘एआरपीयू’बाबत बाजारात चर्चा सुरू आहेत. गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी कोणत्या ५ महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे, याचा हा सविस्तर आढावा:

१) ग्राहकसंख्या ५२ कोटींच्या पुढे; पण पुढील आव्हाने काय?

आर्थिक वर्ष २०२६ मधील आकडेवारीनुसार, जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या तब्बल ५२.४४ कोटींवर पोहोचली आहे. भारतासारख्या अवाढव्य बाजारपेठेत कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी हा एक विक्रमी टप्पा मानला जातो. कंपनीचे ५जी वापरकर्ते आणि ‘एअरफायबर’ ग्राहकांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र, एवढा मोठा ग्राहकवर्ग गाठल्यानंतर आता नवीन ग्राहक जोडण्याचा वेग भविष्यात कायम राहणार का, हा विश्लेषकांसमोरील मोठा प्रश्न आहे.

२) महसुलात १४.६ टक्क्यांची जोरदार वाढ

जिओच्या महसुलाचा आलेख सातत्याने उंचावत असून कंपनीने १.४७ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसुलात १४.६ टाक्यांची घसरण नसून घवघवीत वाढ झाली आहे. जिओ आता केवळ एक टेलिकॉम ऑपरेटर राहिलेली नाही, तर क्लाउड सेवा, एआय आणि डिजिटल इकोसिस्टमच्या बळावर एक ‘टेक कंपनी’ म्हणून उदयास येत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते.

३)  ‘एआरपीयू’ वाढला, मात्र एअरटेलची आघाडी कायम

दूरसंचार कंपन्यांचे मूल्यमापन करण्यासाठी  ‘एआरपीयू’ अर्थात प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न (Average Revenue Per User) हा अत्यंत महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो.जिओचा प्रति ग्राहक सरासरी महसूल वाढून २१४ वर पोहोचला आहे.मात्र, दुसरीकडे मुख्य प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या भारती एअरटेलचा  ‘एआरपीयू’ अजूनही जिओपेक्षा अधिक आहे. जिओने जरी स्वस्त प्लॅन्सच्या जोरावर बाजारावर ताबा मिळवला असला, तरी आगामी काळात नफा वाढवण्यासाठी त्यांना आरपू आणखी सुधारावा लागेल.

४) ५० टक्क्यांहून अधिक ‘एबिटा’ मार्जिन

ऑपरेशनल कामगिरीच्या बाबतीत जिओने आपला दबदबा कायम ठेवला आहे. कंपनीचे ‘एबिटा’ (EBITDA) मार्जिन ५० टक्क्यांपेक्षा जास्त राहिले आहे, जे कंपनीची मजबूत कार्यक्षमता आणि खर्च नियंत्रणात असल्याचे संकेत देते. परंतु, काही बाजार विश्लेषकांच्या मते, भागधारकांना मिळणाऱ्या निव्वळ परताव्याच्या  बाबतीत कंपनीला तिच्या क्षमतांचा पूर्ण वापर करणे अजूनही बाकी आहे.

५) आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर कुठे होणार?

प्राथमिक अंदाजानुसार, या मेगा आयपीओद्वारे उभारण्यात येणाऱ्या निधीचा मोठा हिस्सा कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी (Debt Reduction) आणि भविष्यातील कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरला जाईल. यामुळे रिलायन्स जिओचा ताळेबंद (Balance Sheet) अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, व्याजखर्च कमी झाल्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यात थेट वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.