मुंबई: एकेकाळी मोफत सिमकार्ड वाटून टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी ‘रिलायन्स जिओ’ आता देशातील सर्वात मोठी डिजिटल आणि तंत्रज्ञान कंपनी म्हणून सूचिबद्ध होण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय शेअर बाजार (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) आणि जिओ प्लॅटफॉर्म्सने सेबीकडे मसुदा मंजुरीसाठी कागदपत्रे दाखल केल्याने शेअर बाजारात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु, बाजार विश्लेषकांच्या मते, जिओकडे केवळ एक दूरसंचार कंपनी म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरेल.

१. टेलिकॉम हे केवळ ‘प्रवेशद्वार’

सध्या जिओच्या एकूण महसुलात जवळपास ७७% वाटा हा मोबाईल आणि ब्रॉडबँड सबस्क्रिप्शनचा आहे. असे असले तरी, जिओचे उद्दिष्ट केवळ ग्राहकांना इंटरनेट पुरवणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. कंपनी आपल्या प्रचंड ग्राहकसंख्येचा (सुमारे ५२.४ कोटी युजर्स) वापर करून एक अवाढव्य डिजिटल इकोसिस्टीम तयार करत आहे. इंटरनेट हे ग्राहकांना या इकोसिस्टीममध्ये आणण्याचे केवळ एक माध्यम आहे.

२. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउडवर मोठा सट्टा

जिओ आता ‘टेक जायंट’ बनण्याच्या मार्गावर आहे. कंपनीने खालील क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक सुरू केली आहे. रिलायन्सने एनव्हिडियासोबत भागीदारी करून भारतासाठी एआय इन्फ्रास्ट्रक्चर आणि भाषा मॉडेल्स विकसित करण्याचे काम सुरू केले आहे.

जिओ इंटेलिजन्स : एआय सेवा, डेटा सेंटर्स आणि एज कम्प्युटिंगसाठी कंपनीने एक स्वतंत्र उपकंपनी स्थापन केली आहे. पुढील ७ वर्षांत रिलायन्स आणि जिओ यामध्ये तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

३. ५जीचे भक्कम जाळे आणि ६जीची तयारी

स्पर्धक कंपनी एअरटेलने ४जी नेटवर्क अपग्रेड करून ५जी (NSA) सेवा दिली, तर जिओने तब्बल २ लाख कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र ५जी स्टँडअलोन नेटवर्क उभारले. या प्रगत तंत्रज्ञानामुळे जिओला कॉर्पोरेट क्षेत्र आणि क्लाउड गेमिंग यांसारख्या हाय-स्पीड सेवांमध्ये मोठी आघाडी मिळाली आहे. तसेच, २०३० पर्यंत सर्व ग्राहकांना ५जी वर स्थलांतरित करण्याचे आणि ६जी वर काम करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

४. जागतिक दिग्गजांचा विश्वास

२०२० मध्ये मेटा (Meta), गूगल (Google), सिल्वर लेक आणि केकेआर (KKR) सारख्या जागतिक कंपन्यांनी जिओमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. विशेष म्हणजे, या आयपीओमध्ये हे मोठे गुंतवणूकदार आपले शेअर्स विकणार नसून कंपनीतच राहणार आहेत. जिओचे रूपांतर एका मोठ्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्ममध्ये होत असून, भविष्यात यातून अफाट संपत्ती निर्माण होईल, असा विश्वास या जागतिक कंपन्यांना आहे.

५. आयपीओच्या पैशांचा वापर: कर्जातून मुक्ती

या आयपीओमधून येणाऱ्या निधीचा मोठा हिस्सा (सुमारे २७,५०० कोटी रुपये) जिओ आपल्या टेलिकॉम उपकंपनीवरील कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. कर्जमुक्त झाल्यामुळे कंपनीवरील व्याजाचा भार कमी होईल आणि हा वाचलेला पैसा एआय तसेच डेटा सेंटर्स उभारण्यासाठी वापरता येईल.

बाजारात टेलिकॉम कंपन्यांना ‘युटिलिटी कंपन्या’ (जसे की वीज किंवा पाणी पुरवठा करणाऱ्या कंपन्या) म्हणून पाहिले जाते, ज्यांना फार मोठे व्हॅल्युएशन मिळत नाही. मात्र, सॉफ्टवेअर आणि टेक कंपन्यांना बाजार नेहमीच चढ्या भावाने मोजतो. जिओ स्वतःला प्रोपायटरी डिजिटल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म” म्हणून सादर करत आहे. त्यामुळे हा आयपीओ केवळ टेलिकॉमचा नसून, भारताच्या डिजिटल भविष्याला अर्थबळ देणारा ठरणार आहे.