मुंबई : देशातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने तिचा डिजिटल आणि दूरसंचार विभाग असलेल्या ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) मसुदा प्रस्ताव नियामकांकडे शुक्रवारी दाखल केला. यातून अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळींना पूर्णविराम मिळाला असून, भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रीच्या प्रक्रियेला झालेली ही औपचारिक सुरुवात मानली जात आहे.
शुक्रवारी मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली. संचालक मंडळाने २७ कोटी समभागांच्या प्रारंभिक विक्रीस मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि या सभेला त्यांनी राज्याभिषेक सोहळ्याचेही रूप दिले. त्यांनी कंपनीची सूत्रे पुढच्या पिढीच्या हाती सोपवत असल्याची आणि आकाश, ईशा व अनंत अंबानी ही त्यांची मुलेच या महा-आयपीओची प्रक्रिया चालवणार असल्याचे आवर्जून नमूद केले.
प्रस्तावित आयपीओची रचना सुटसुटीत आहे. १० रुपये दर्शनी मूल्याच्या२७ कोटी समभागांची ही पूर्णपणे नव्याने विक्री (फ्रेश इश्यू) असेल. म्हणजेच विद्यमान भागधारकांपैकी कोणीही हिस्सा विकणार नाही. बाजारातील अंदाजानुसार, याद्वारे साधारण ३५ ते ४० हजार कोटी रुपये उभारले जातील. यामुळे कंपनीचे मूल्यांकन हे १२ ते १५ लाख कोटी रुपये पातळीवर जाईल. जे ‘जिओ’ला जगातील सर्वाधिक मूल्य असलेल्या सूचीबद्ध कंपन्यांच्या पंक्तीत स्थान मिळवून देणारे ठरेल.
आयपीओच्या घोषणेसह, ‘जिओ’च्या विस्ताराच्या पुढील टप्प्यासाठी पाच धोरणात्मक प्राधान्यक्रमही मांडण्यात आले. कंपनी ‘जिओ ट्रू ५जी’ नेटवर्कचा स्वीकार वाढवण्याची योजना आखत आहे. २०३० पर्यंत सर्व ग्राहकांना ५जी सेवेवर आणण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे, तसेच ६जी मानकांच्या विकासामध्ये भारताची भूमिका अधिक बळकट करण्यावरही कंपनी भर देत आहे. शिवाय ‘जिओ एअर फायबर’द्वारे हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवांचा विस्तार करण्याचेही उद्दिष्ट आहे. सुमारे ९० टक्क्यांहून अधिक जोडण्या २४ तासांच्या आत पूर्ण केल्या जातात आणि दररोज ६०,००० पर्यंत नवीन घरांना ब्रॉडबँड जाळ्याशी जोडली जात आहेत.
‘रिलायन्स’च्या विद्यमान भागधारकांना लाभ शक्य
अंबानी यांनी ‘जिओ’च्या आयपीओला कंपनीसाठी या वर्षातील मूल्य निर्मितीची सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हटले आहे. ते म्हणाले, ‘जिओ’ची प्रस्तावित सूचिबद्धता जगाला हे दाखवून देईल की, भारत जागतिक स्तरावरील, जागतिक क्षमता असलेल्या आणि जागतिक मूल्य निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्या उभारू शकतो. मसुदा प्रस्तावाच्या मंजुरीनंतर, अंतिमत: ‘बुक-बिल्डिंग’ प्रक्रिया निर्धारीत केली जाईल तेव्हा रिलायन्स विद्यमान भागधारकांना प्रस्तावित आयपीओत वाटा दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
नव्या डिजिटल युगाचे नेतृत्व
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्स २०२६ पासून सुरू होणाऱ्या पुढील सात वर्षांत एआय-संबंधित उपक्रमांमध्ये १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करतील, असे अंबानी यांनी जाहीर केले होते. कंपनीने ‘जिओ इंटेलिजन्स’ नावाची पूर्ण मालकीची उपकंपनीही स्थापन केली आहे. ही कंपनी मोठ्या प्रमाणावरील डेटा सेंटर पायाभूत सुविधा आणि ‘एज कम्प्युटिंग’ क्षमतांद्वारे एआय सेवांचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
बड्या तंत्र कंपन्यांची पहिली पसंती
जिओ प्लॅटफॉर्म्सने यापूर्वी जगातील काही सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. २०२० मध्ये, कंपनीने मेटा, गूगल, केकेआर, सिल्व्हर लेक आणि जनरल अटलांटिक यांसारख्या गुंतवणूकदारांकडून २,००० कोटी डॉलरहून अधिक निधी उभारला. या व्यवहारामुळे कंपनीचे मूल्य ५७०० अब्ज ते ६५०० कोटी डॉलरच्या दरम्यान निश्चित गेले आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे जिओ प्लॅटफॉर्म्सचा ६६.४३ टक्के हिस्सा आहे, तर मेटाकडे ९.९९ टक्के हिस्सा आहे. मेटाने हा हिस्सा २०२० मध्ये ५७० कोटी डॉलरच्या गुंतवणुकीद्वारे मिळविला आहे.
