मुंबई: जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला आलेले महत्त्व ओळखून रिझर्व्ह बँकेने सोन्याची खरेदी वेगाने वाढवली आहे. सोन्याच्या वाढत्या किमती आणि रिझर्व्ह बँकेची सातत्यपूर्ण खरेदी यामुळे सोन्याच्या साठ्याचे मूल्य तब्बल ११५.८ अब्ज डॉलरवर (सुमारे ९.६ लाख कोटी रुपये) पोहोचले आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या दोन वर्षांत या मूल्यामध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. मध्यवर्ती बँकांनी आगामी काळात सोन्याचा साठा वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (डब्ल्यूजीसी) ताज्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

भारताच्या एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा गेल्या सहा महिन्यांत १७ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच काळात १२ टक्के होता. प्रामुख्याने अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करून गंगाजळीत वैविध्य आणण्याच्या भारताच्या धोरणात्मक प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे. गेल्या काही वर्षांत रिझर्व्ह बँकेसह जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची विक्रमी खरेदी केली आहे.

गेल्या चार वर्षांत मध्यवर्ती बँकांकडून वार्षिक सरासरी तब्बल १,००० टन सोने खरेदी झाली आहे, जी आधीच्या दशकातील वार्षिक ५०० टन सरासरीच्या दुप्पट आहे.फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर आणि त्यानंतर अमेरिकेने रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांनंतर जगभरातील मध्यवर्ती बँकांनी राखीव साठ्यांचे धोरण बदलले आहे. वित्तीय निर्बंध आणि चलनाचा चढ-उतार यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विकसनशील देशांच्या बँकांनी सोन्याचा साठा वाढवण्याचा धडाका लावला आहे.

दशकभराची सुवर्ण वाटचालरिझर्व्ह बँकेने गेल्या दशकापासून सोन्याचा साठा वाढवण्याचे दीर्घकालीन धोरण आखले आणि २०१९ नंतर या खरेदीला अधिक वेग आला.

  • २०१५: ५५७.८ टन
  • २०१९: ६१२.६ टन
  • २०२०: ६५३ टन
  • २०२२: ७६०.४ टन
  • २०२६ (पहिली तिमाही): ८८०.५ टन

गेल्या दहा वर्षांत भारताच्या सुवर्ण-साठ्यात तब्बल ५८ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे.

पोलंड आणि चीनचीही आक्रमक खरेदीसोन्याची खरेदी वाढवण्यात केवळ भारतच नाही, तर युरोप आणि आशियातील इतर देशही आघाडीवर आहेत. युक्रेन युद्धाच्या छायेखाली असलेल्या पोलंडने सुरक्षेचा उपाय म्हणून सर्वात आक्रमक खरेदी केली आहे. २०२३ मध्ये २२८.७ टन असलेला पोलंडचा साठा २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ५८१.६ टनांवर पोहोचला आहे. अवघ्या तीन वर्षांत पोलंडने ३५३ टन सोने खरेदी केले.चीनने २०२० ते २०२२ दरम्यान खरेदी संथ ठेवली होती, मात्र २०२३ पासून त्यांनी पुन्हा खरेदी सत्र सुरू केले. चीनचा सोन्याचा साठा २०२३ मधील २,०६८ टनांवरून वाढून २०२६ मध्ये २,३१३ टनांवर पोहोचला आहे.

डॉलरला का लागतोय धक्का?आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेने विविध देशांवर लादलेले आर्थिक निर्बंध आणि ‘डॉलर’चा शस्त्रासारखा केलेला वापर यांमुळे अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्था धास्तावल्या आहेत. सुमारे ८५ टक्के विकसनशील देशांच्या मध्यवर्ती बँकांनी, भू-राजकीय अनिश्चिततेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सोने हाच सर्वात प्रभावी पर्याय असल्याचे मान्य करत, डॉलरऐवजी सोन्याचा साठा वाढवत आणला आहे. तर ९० टक्के बँकांनी संकटकाळात सोन्याची कामगिरी सर्वोत्तम राहत असल्याचा पुनरुच्चार केला.

जग अधिक अस्थिर आणि अनपेक्षित बनत चालले आहे. अशा वेळी सुरक्षितता, तरलता आणि परतावा या त्रिसूत्रीवर सोने हेच सर्वोत्तम साधन ठरत आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँका आता सोन्याकडे एक ‘वारसा धन’ म्हणून न पाहता, एक ‘सक्रिय धोरणात्मक गुंतवणूक’ म्हणून पाहत आहेत.

  • शौकाई फॅन, (ग्लोबल हेड ऑफ सेंट्रल बँक्स, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल)