Rich Dad Poor Dad Author Robert Kiyosaki Investment Advice Gold Silver And Bitcoin: ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि सोने, चांदी व क्रिप्टोकरन्सीमधील दिग्गज गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी येत्या काळात जागतिक आर्थिक संकटाचे भाकीत केले आहे.
हे भाकीत करत असताना त्यांनी गुंतवणूकदारांना सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहनदेखील केले आहे. त्यांच्या मते, आर्थिक संकट येण्यापूर्वीच तुम्ही सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास संभाव्य आर्थिक फटका बसणार नाही.
“फुगा फोडणारी टाचणी” या मथळ्याखाली लिहिलेल्या एक्स पोस्टमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या फॉलोअर्ससमोर असा प्रश्न उपस्थित केला की, “फुगा फुटण्यापूर्वी (आर्थिक संकट) आत्ताच जास्तीत जास्त सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथरियम का खरेदी करावे?”
…तेव्हा इतर सर्व लोक गरीब होत असतील
याचे उत्तर देताना रॉबर्ट कियोसाकी म्हणाले की, “कारण एकदा का ती टाचणी लागली की, मग ती घटना कोणतीही असो, ज्यामुळे हा आर्थिक फुगा फुटेल, त्यानंतर सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथरियमचे भाव गगनाला भिडतील. ‘रिच डॅड’चा हा नियम नेहमी लक्षात ठेवा की तुमचा नफा तुम्ही खरेदी करता तेव्हा होतो, जेव्हा तुम्ही विक्री करता तेव्हा नाही. हा फुगा फुटण्यापूर्वीच खरेदी करा आणि श्रीमंत व्हा, तेव्हा इतर सर्व लोक गरीब होत असतील. स्वतःची काळजी घ्या.”
कालही दिला होता आर्थिक संकटाचा इशारा
तत्पूर्वी काल (१७ मार्च २०२६) ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी इशारा दिला होता की, त्यांच्या मते इतिहासातील सर्वात मोठा ‘ॲसेट बबल’ (आर्थिक संकट) लवकरच फुटू शकतो.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये, कियोसाकी यांनी संभाव्य जागतिक आर्थिक संकटानंतर सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियमच्या किमतींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला होता. या प्रसिद्ध आर्थिक लेखकाचा असा युक्तिवाद आहे की, जेव्हा हा ‘बबल’ फुटेल, तेव्हा पर्यायी मालमत्तांच्या म्हणजेच सोने, चांदी आणि क्रिप्टोकलन्सीच्या मूल्यात मोठी वाढ होऊ शकते.
जेवण टाळा पण…
तत्पूर्वी १० मार्च २०२६ रोजी केलेल्या एका एक्स पोस्टमध्येही रॉबर्ट कियोसाकी यांनी मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते, “मला चांदी खूप आवडते कारण २०२६ मध्येही तुमच्याकडे फक्त १० डॉलर असले तरी तुम्ही सोन्या-चांदीच्या विक्रेत्याकडून या किमतीची चांदीची जुनी नाणी खरेदी करू शकता. केवळ १० डॉलरमध्ये कोणीही चांदीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतो. जर तुमच्याकडे १० डॉलर शिल्लक नसतील तर एक दिवस जेवण टाळा, पण चांदीत गुंतवणूक करा.”
