Right Age to Buy a House : घर खरेदी करण्याचे योग्य वय कोणते? हा सध्याच्या पिढीसमोरील मोठा प्रश्न आहे. ८०-९० च्या दशकात विशीत लग्न आणि ३०-३५ च्या आत घर खरेदी केलं जात होतं. मात्र, काळाप्रमाणे आपली आर्थिक उद्दिष्टही बदलावी लागतात. सध्याची महागाई, गगनाला भिडलेले प्रॉपर्टीचे दर आणि अनिश्चित रोजगार यामुळे नेमकं कोणत्या वयात घर घ्यावं? असा प्रश्न प्रत्येकासमोर आहे. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध डिजिटल फायनान्स कन्टेन्ट क्रिएटर अंकुर वारिकू यांनी स्वतःचा अनुभव शेअर केला आहे. वयाच्या २५ किंवा ३० व्या वर्षी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करता, वयाच्या ४० व्या वर्षी आपले पहिले घर का खरेदी केले, याचा मोठा खुलासा त्यांनी इन्स्टाग्रामवर केला आहे.

अंकुर वारिकू यांनी वयाच्या ४० व्या वर्षी घर खरेदी का केलं? ३ मुख्य कारणं

  • अंकुर वारिकूंच्या मते, वयाच्या तिशीपर्यंत करिअर आणि व्यवसायासाठी शहर आणि देश बदलण्याची लवचिकता त्यांना हवी होती. मात्र, चाळीशीत येईपर्यंत त्यांना आणि त्यांच्या पत्नी रुची बुद्धिराजा यांना समजलं की त्यांचे उर्वरित आयुष्य दिल्लीतच घालवायचे आहे. त्यामुळेच त्यांनी योग्य ठिकाणाची निवड केली.
  • वयाच्या २५ किंवा ३० व्या वर्षी सध्याचे घर त्यांच्या आवाक्याबाहेर होते. मात्र, वयाच्या ४० व्या वर्षी त्यांच्याकडे डाऊन पेमेंटसाठी पुरेसा निधी होता, नियमित मासिक हप्ता भरण्याची क्षमता होती.
  • वयाची तिशी ओलांडल्यानंतर जेव्हा मुलं होतात आणि आयुष्य एका मार्गावर स्थिर होते, तेव्हा नेमकं किती मोठं घर हवं आहे आणि कोणत्या भागात घर घ्यावे, याची स्पष्ट कल्पना येते. त्यामुळे त्यांना वयाची चाळीशीत घर घेण्याचा निर्णय योग्य वाटला.

तरुणांसाठी काय आहे सल्ला?

अंकुर वारिकू यांनी तरुणांना स्पष्ट सल्ला दिला आहे की, फक्त लोक करतात म्हणून किंवा दबावाखाली येऊन विशीत किंवा तिशीच्या सुरुवातीलाच घाईघाईने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू नका. जेव्हा स्वतःची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि आयुष्यात योग्य वेळ येईल, तेव्हाच आपल्या स्वप्नातील घराची गुंतवणूक करा.

गृहकर्ज हा प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय समजला जातो. याचे हप्ते फेडण्यासाठी २० ते ३० वर्षे लागतात. करिअरच्या सुरुवातीलाच मोठा आर्थिक भार अंगावर पडला तर प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात. अशावेळी आपल्यावर असलेल्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि उत्पन्न याची सांगड ज्यावेळी बसेल त्या वयात घर घेण्याचा निर्णय घ्यावा असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.