Robert Kiyosaki Gold Silver Investment Strategy: रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियॉसाकी हे सोने, चांदी आणि बिटकॉइनमधील गुंतवणुकीसाठी ओळखले जातात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर सातत्याने व्यक्त होत, सर्वसामान्यांना यातील गुंतवणुकीविषयी मार्गदर्शनही करत असतात.
आता रॉबर्ट कियॉसाकी यांनी आज एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोने, चांदी आणि बिटकॉइनमधील गुंतवणूकीबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी या तिन्ही मालमत्तांमधील गुंतवणूक थांबवल्याचे सांगत, यामध्ये पुन्हा केव्हा गुंतवणूक सुरू करणार हे सुद्धा स्पष्ट केले आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये रॉबर्ट कियॉसाकी म्हणाले की, “मी एक्सवर यापूर्वी पोस्ट केल्याप्रमाणे, चांदी ६० डॉलरवर असताना, बिटकॉइन ६,००० डॉलरवर असताना आणि सोने ३०० डॉलरवर असताना त्यांची खरेदी थांबवली होती. मी काही बिटकॉइन आणि थोडे सोने विकले आहे. मला विकायला आवडत नाही कारण मला भांडवली नफ्यावर कर भरायला आवडत नाही. पण, आता मी सोने आणि बिटकॉइनच्या नवीन नीचांकी किमतींची संयमाने वाट पाहत आहे, त्यानंतर मी पुन्हा खरेदी करेन.”
यावेळी त्यांनी यातून काय धडा घ्यायचा याबद्दल म्हटले की, “रिच डॅडचा धडा: तुमचा नफा खरेदी करताना होतो, विक्री करताना नाही. जेव्हा मी पुन्हा खरेदी सुरू करेन, तेव्हा मी एक्सवर पोस्ट करेन.”
पुढे गुंतवणूक रणनितीबाबत रॉबर्ट कियॉसाकी यांनी म्हटले की, “संयम, सतर्कता आणि यूट्यूबवर सतत अभ्यास करणे ही आज तुमची सर्वात हुशार आर्थिक सवय ठरू शकते. मी चांदी ७४ डॉलर्स आणि सोने ४,००० डॉलर्स झाल्यावर आणखी खरेदी करेन. सध्या माझ्याकडे पुरेसे इथेरियम आहे. नंतर आणखी खरेदी करेन. पुढे कठीण काळ आहे.”
‘श्रीमंत आणि गरीब लोकांमधील फरक’
काही दिवसांपूर्वीच्या ‘श्रीमंत आणि गरीब लोकांमधील फरक’ या मथळ्याखालील आपल्या पोस्टमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अशी तुलना केली आहे, जी समजायला सोपी आणि दुर्लक्ष करणे कठीण आहे. “जेव्हा वॉलमार्टमध्ये सेल लागतो, तेव्हा गरीब लोक धावत जातात आणि खूप खरेदी करतात. पण जेव्हा शेअर बाजार, सोन्या-चांदीच्या किमती घसरतात, म्हणजेच बाजार कोसळतो तेव्हा गरीब लोक आपली गुंतवणूक विकून पळून जातात, तर श्रीमंत लोक धावत येतात आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.”
“सोन्याचा, चांदीचा आणि बिटकॉइनचा बाजार कोसळला आहे. म्हणजेच, तो स्वस्त झाला आहे आणि त्यामुळे मी हातात रोकड घेऊन सवलतीच्या दरात अधिक सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करण्यासाठी वाट पाहत आहे”, असे त्यांनी लिहिले आणि पुढे विचारले, “तुम्ही काय करणार आहात?”

