Robert Kiyosaki On Gold Silver Price Crash: सोन्याचे भाव कोसळत आहेत, चांदीची किंमत गडगडत आहे, बिटकॉइनची किंमत घसरत आहे आणि गुंतवणूकदार घाबरले आहेत. पण या कठीण परिस्थितीतही रॉबर्ट कियोसाकी शांत असून हातात रोकड घेऊन तयार आहेत. ते बाजारातील या परिस्थितीकडे ‘सेल’ म्हणून पाहत आहेत. बहुतेक गुंतवणूकदार धावाधाव करत असताना, ते एक महत्त्वाचा प्रश्न विचारत आहेत की, “तुम्ही काय करणार आहात?”
‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांना बाजारातील गोंधळाचे रूपांतर जीवनातील धड्यांमध्ये करण्याची सवय आहे. यावेळीही काही वेगळे नव्हते. सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या किमती झपाट्याने घसरत असताना, लोक कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात आणि बाजार कोसळल्यावर श्रीमंत आणि गरीब लोक अनेकदा विरुद्ध पावले का उचलतात, याबद्दलचे कठोर सत्य त्यांनी सांगितले आहे.
जेव्हा वॉलमार्टमध्ये सेल लागतो…
‘श्रीमंत आणि गरीब लोकांमधील फरक’ या मथळ्याखालील आपल्या पोस्टमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी एक अशी तुलना केली आहे, जी समजायला सोपी आणि दुर्लक्ष करणे कठीण आहे. “जेव्हा वॉलमार्टमध्ये सेल लागतो, तेव्हा गरीब लोक धावत जातात आणि खूप खरेदी करतात. पण जेव्हा शेअर बाजार, सोन्या-चांदीच्या किमती घसरतात, म्हणजेच बाजार कोसळतो तेव्हा गरीब लोक आपली गुंतवणूक विकून पळून जातात, तर श्रीमंत लोक धावत येतात आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.”
त्यांच्या मते, भीती माणसाचे वर्तन ठरवते. जेव्हा दैनंदिन जीवनात किमती कमी होतात, तेव्हा लोकांना आनंद होतो. पण जेव्हा आर्थिक बाजार कोसळतो, तेव्हा तेच लोक घाबरून जातात.
“सोन्याचा, चांदीचा आणि बिटकॉइनचा बाजार कोसळला आहे. म्हणजेच, तो स्वस्त झाला आहे आणि त्यामुळे मी हातात रोकड घेऊन सवलतीच्या दरात अधिक सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करण्यासाठी वाट पाहत आहे”, असे त्यांनी लिहिले आणि पुढे विचारले, “तुम्ही काय करणार आहात?”
अस्थिरता असूनही कियोसाकी चांदी का खरेदी करतात?
रॉबर्ट कियोसाकी यांनी अलीकडेच सांगितले की, उत्पन्न मिळवून देणारी स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी ते धोरणात्मकदृष्ट्या कर्जाचा वापर करण्यास प्राधान्य देतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियमची सातत्याने खरेदी करतात.
त्यांनी यावर जोर दिला की, मालमत्तेतील गुंतवणुकीतून मिळणारा सकारात्मक रोख प्रवाह त्यांना बाजारातील चढ-उतारांदरम्यान चांदी विकण्याऐवजी ती स्वतःकडे ठेवण्याची संधी देतो.
गेल्या वर्षीची पोस्ट चर्चेत
डिसेंबर २०२५ मध्ये रॉबर्ट कियॉसाकी यांनी चांदीबद्दलची आपली दीर्घकाळापासूनची आवड पुन्हा व्यक्त करताना गुंतवणूकदारांना संधी हुकण्याच्या भीतीपोटी आंधळेपणाने चांदीच्या मागे न धावण्याचा इशारा दिला होता.
“मला चांदी खूप आवडते. मी १९६५ मध्ये पहिल्यांदा चांदी खरेदी केली होती”, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आणि पुढे म्हटले की सध्याच्या तेजीमध्ये “फोमो” म्हणजेच संधी गमावण्याच्या भीतीची चिन्हे दिसत आहेत. कियोसाकी यांनी इशारा दिला की अशा टप्प्यांनंतर अनेकदा मोठी घसरण होते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी किंमत उच्च पातळीवर असताना घाई करण्याऐवजी संयम बाळगावा.

