Robert Kiyosaki Questions Investors After Stock Market Crash: रिच डॅड अँड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियॉसाकी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात. आपल्या पोस्ट्सद्वारे ते गुंतवणूकदारांना सोने, चांदी आणि क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीचे फायदे आणि याचबरोबर कुठे गुंतवणूक करणे टाळावे यावरही भाष्य करत असतात.

पार्श्वभूमी

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील व्यत्ययामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळत आहेत. यामध्ये अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक एस अँड पी ५०० मध्येही मोठी घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रॉबर्ट कियॉसाकी यांनी पोस्ट करत गुंतवणूकदारांसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

रॉबर्ट कियॉसाकी यांची पोस्ट

आज एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रॉबर्ट कियॉसाकी यांनी एस अँड पी ५०० निर्देशांकातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर काही कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि यावर उत्तरेही दिली आहेत.

रॉबर्ट कियॉसाकी यांनी “तुमचे पैसे बुडाले का?” आणि “तुम्ही बाजारातील या कठीण परिस्थितीत पैसे कमावले का?”, असे दोन प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केले. याचे उत्तर देताना ते म्हणाले, “जर तुमचे पैसे बुडाले असतील तर तुमचे मार्गदर्शक बदलण्याची वेळ आली आहे का?”

सर्वांसमोर नावे उघड करणे अयोग्य

“तुम्ही युट्यूबवर कोणाला फॉलो करता?”, असा प्रश्न रॉबर्ट कियॉसाकी यांनी पुढे उपस्थित केला. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, “मला युट्यूबवरील अशा काही ‘फायनान्शिअल रॉकस्टार्सची’ नावे माहिती आहेत, ज्यांचे पैसे मोठ्या प्रमाणात बुडाले आहेत. पण त्यांची नावे सर्वांसमोर उघड करणे योग्य दिसणार नाही. अशा परिस्थितीत मी किती पैसे कमावले याबद्दल बढाई मारू शकलो असतो. पण ते त्याहून अधिक अयोग्य दिसले असते. शेवटी, जर तुमचे पैसे बुडाले असतील तर तुम्हाला कदाचित अधिक चांगल्या मार्गदर्शकाचा शोध घेण्याची गरज आहे. काळजी घ्या.”

गुंतवणूकदारांना लाखो कोटी रुपयांचा फटका

गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्तपणे हल्ले केले. या हल्ल्यांना इराणनेही प्रत्युत्तर दिल्याने मध्य पूर्वेत लष्करी संघर्ष वाढला आहे. परिणामी जगभरातील कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. पुरवठा साखळीतील संभाव्य व्यत्ययामुळे जगभरात महागाईचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या आहेत. या कालावधीत आतापर्यंत जगभरातील गुंतवणूकदारांना लाखो कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे.

रॉबर्ट कियॉसाकी यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे

बाजारातील या अस्थिर परिस्थितीत गुंतवणूकदारांनी शहाणपणाने निर्णय घेणे महत्त्वाचे ठरत आहे, अन्यथा त्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर रॉबर्ट कियॉसाकी यांनी गुंतवणूकदारांसमोर उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत.