Robert Kiyosaki Stock Market Crash Warning 2026: जगप्रसिद्ध पुस्तक ‘रिच डॅड पुअर डॅड’ चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी आज, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी युजर्सना शेअर बाजारातील संभाव्य घसरणीबद्दल इशारा दिला आहे. यामध्ये त्यांनी ही घसरण जगाने पाहिलेली सर्वात मोठी घसरण असेल, असे म्हटले आहे.

पोस्टमध्ये रॉबर्ट कियॉसाकी यांनी त्यांच्या २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या “रिच डॅड्स प्रोफेसी” चा संदर्भ दिला आणि या घटनेची भविष्यवाणी केली. “तो महाकाय अपघात आता जवळ आला आहे” असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी युजर्सना यासाठी स्वतःला तयार ठेवण्याचे आवाहन केले.

कियॉसाकी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असेही सूचित केले की जेव्हा हा बाजार कोसळेल तेव्हा काही लोक खूप श्रीमंत होतील आणि इतरांचे खूप नुकसान होईल.

रॉबर्ट कियॉसाकी यांचा असा विश्वास आहे की जे लोक तयार आहेत आणि ज्यांच्याकडे “खरी” मालमत्ता आहे त्यांना फायदा होईल. परंतु जे लोक या क्रॅशसाठी तयार नाहीत, ते मोठ्या प्रमाणात पैसे गमावण्याची शक्यता जास्त आहे.

सध्या बाजार थोडा डळमळीत असला तरी त्यांनी पोस्टमध्ये पुढे बिटकॉइनबद्दल उत्साही असल्याचा उल्लेख केला. त्यांनी असेही म्हटले की त्यांच्याकडे भौतिक सोने, चांदी, इथेरियम आणि बिटकॉइन आहेत. ते कागदी चलनासारख्या बनावट मालमत्तांमधील गुंतवणूक टाळतात.

शिवाय, कियॉसाकी यांच्या मते, जेव्हा बिटकॉइनची किंमत कमी होते आणि लोक घाबरून विक्री करतात, तेव्हा ते त्याकडे डिस्काउंट सेल म्हणून पाहतात, जसे की स्वस्त किमतीत काहीतरी मौल्यवान खरेदी करणे.

ते म्हणाले की, “मी बिटकॉइनबद्दल इतका उत्साही आहे की बिटकॉइनची किंमत कमी होत असताना मी अधिकाधिक खरेदी करत आहे. मी बिटकॉइन खरेदी करत आहे कारण फक्त २.१ कोटी बिटकॉइन असतील आणि जवळजवळ २.१ कोटी बिटकॉइन आधीच चलनात आहेत.”

“येणाऱ्या संकटात लोक घाबरून बिटकॉइन विकतील आणि मी आणखी बिटकॉइन खरेदी करेन. जर तुम्हाला हे लक्षात आले की क्रॅश हा श्रीमंत होण्याचा सर्वोत्तम काळ आहे, तर येणारा क्रॅश तुम्हाला तुमच्या स्वप्नांपेक्षाही श्रीमंत बनवू शकतो,” असे रॉबर्ट कियॉसाकी शेवटी म्हणाले.