Robert Kiyosaki Warning About Stock Market Crash 2026: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात गेल्या आठवड्यापासून जोरदार लष्करी संघर्ष सुरू आहे. या लष्करी संघर्षाचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होत आहे. तेल पुरवठ्यातील या व्यत्ययामुळे महागाई वाढण्याची भीती आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या आहेत, परिणामी जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण होत आहे. शेअर बाजारांच्या या परिस्थितीवर भाष्य करत रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियॉसाकी यांनी बाजार आणखी कोसळण्याचा इशारा दिला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी बाजाराची घसरण आणि सोने, चांदी आणि क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीवर भाष्य केले आहे.

मी पुन्हा इशारा देत आहे

“रिच डॅड्स प्रोफेसी (२०१३) पुस्तकात मी शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ‘क्रॅश’चा इशारा दिला होता. मला आशा आहे की, २०२६ मध्ये मी चुकीचा ठरेन. पण मला भीती आहे की तो ‘क्रॅश’ आता खरोखर येत आहे. मी पुन्हा एक इशारा देत आहे”, असे म्हणत रॉबर्ट कियॉसाकी यांनी आपल्या पोस्टची सुरुवात केली आहे.

पोस्टमध्ये ते पुढे म्हणाले, “मी ही भविष्यवाणी का केली होती? कारण २००८ च्या ‘ग्रेट फायनान्शियल क्रायसिस’चे मूळ कारण कधीच सुधारले गेले नाही. त्यामुळे त्यानंतर येणारा क्रॅश हा अधिक मोठाच असणार. २००८ मध्ये मी सीएनएनच्या वोल्फ ब्लिट्झरच्या कार्यक्रमात लेहमन ब्रदर्स कोसळण्याची भविष्यवाणी केली होती आणि काही दिवसांनंतरच ती कंपनी बुडाली. तुम्ही खात्री करू शकता.”

…ते अत्यंत वेगवान आणि विनाशकारी असेल

“२०२६ मध्ये येणारा क्रॅश हा ब्लॅक रॉकच्या प्रायव्हेट क्रेडिट पॉन्झी स्कीममुळे सुरू होईल असे मला वाटते. माझी इच्छा आहे की मी चुकीचा ठरावा. पण जर आणि जेव्हा ‘ब्लॅक रॉक’ कोसळेल, तेव्हा ते अत्यंत वेगवान आणि विनाशकारी असेल. जगभरातील निवृत्त व्यक्तींची पुंजी नष्ट होईल, कारण संपूर्ण जग अशा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहे जे ते परत करू शकत नाही”, असे कियॉसाकी यांनी नमूद केले.

सोन्या-चांदीत गुंतवणूक

गुंतवणूकदारांना सल्ला देताना रॉबर्ट कियॉसाकी शेवटी म्हणाले की, “मी गुंतवणूकदारांना अजूनही सुचवतो की त्यांनी सक्रिय व्हावे आणि सोने, चांदी, बिटकॉईन, इथेरिअम आणि खऱ्या तेलाच्या विहिरींमध्ये गुंतवणूक करावी. किंमती झपाट्याने वाढल्या तर जास्त फायदा होईल, कारण चांदी दुर्मिळ होत जाईल आणि तेलाच्या किमती वाढतील.”

…तर एक दिवस जेवण टाळा

“मला चांदी खूप आवडते कारण २०२६ मध्येही तुमच्याकडे फक्त १० डॉलर असले तरी तुम्ही सोन्या-चांदीच्या विक्रेत्याकडून या किमतीची चांदीची जुनी नाणी खरेदी करू शकता. केवळ १० डॉलरमध्ये कोणीही चांदीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतो. जर तुमच्याकडे १० डॉलर शिल्लक नसतील तर एक दिवस जेवण टाळा, पण चांदीत गुंतवणूक करा”, असे ते चांदीच्या गुंतवणुकीबाबत म्हणाले.