Suryakumar Yadav Wife Buys Flat In Mumbai: मुंबईच्या समृद्ध रिअल इस्टेट क्षेत्राबाबत भारतीय क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांचा रस अलिकडील काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे क्रिकेट क्षेत्रातील मंडळींकडून मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक वाढत आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी महागड्या निवासी मालमत्ता खरेदी केल्या आहेत. यामध्ये आता नुकतेच टी-२० विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचाही समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांत सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि झहीर खान यांच्या कुटुंबीयांनी मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये एकत्रितपणे ६५ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

सूर्यकुमार यादव-देविशा यादव

अलीकडेच सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा यादवने मुंबईतील देवनार परिसरात ७.१८ कोटी रुपयांचा एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. गोदरेज स्काय टेरेसेस प्रकल्पात असलेला हा फ्लॅट सुमारे १,५०० चौरस फूट क्षेत्रफळाचा आहे आणि मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार २० फेब्रुवारी २०२६ रोजी त्याची नोंदणी झाली आहे.

ही खरेदी करण्यासाठी देविशा यादवला ३५.९ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले. सीआरई मॅट्रिक्सने पाहिलेल्या कागदपत्रांनुसार, ही खरेदी याच प्रकल्पातील या जोडप्याचा तिसरा फ्लॅट आहे, ज्यामुळे शहरातील त्यांचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाला आहे.

मार्च २०२५ मध्ये देविशा यादवने त्याच इमारतीत १७ व्या आणि १८ व्या मजल्यावर आणखी दोन फ्लॅट २१ कोटींपेक्षा जास्त किमतीत खरेदी केले असल्याचे कागदपत्रांमधून समोर आले आहे.

रोहित शर्मा- रितिका सजदेह

क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने मुंबईतील प्रभादेवी परिसरात २६.३० कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. आहुजा टॉवर्समध्ये असलेल्या या फ्लॅटचे क्षेत्रफळ सुमारे २,७६० चौरस फूट आहे आणि त्यात तीन कार पार्किंग स्पेस आहेत. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांवरून असे दिसून येते की या व्यवहारावर सुमारे १.३१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आकारली गेली होती आणि १२ डिसेंबर २०२५ रोजी त्याची नोंदणी झाली होती.

झहीर खान-सागरिका घाटगे

सध्याच्या खेळाडूंव्यतिरिक्त माजी क्रिकेटपटू देखील मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये सक्रिय आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने अभिनेत्री सागरिका घाटगेसह कुटुंबातील सदस्यांसह एल्फिन्स्टन रोडवरील इंडियाबुल्स स्काय इमारतीत सुमारे ११ कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.