Rupee Value Drop Dollar Rate Impact On Common Man: पश्चिम आशियातील युद्ध आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या सातत्याने वाढत जाणाऱ्या किमती यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची वारंवार घसरण होत आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची सर्वकालीन नीचांकी घसरण झाली. आज रुपयामध्ये जवळपास ०.३ टक्क्यांची घसरण होऊन त्याचा विनिमय दर प्रति डॉलर ९६.२२ वर पोहोचला. या नव्या घसरणीमुळे पश्चिम आशियातील संकट सुरू झाल्यापासून रुपयामध्ये आतापर्यंत ५.५ टक्क्यांची घट झालेली आहे. मागच्याच आठवड्यात भारतीय रुपयाने प्रति डॉलर ९६ रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
रुपयाच्या घसरणीची कारणे काय?
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे रुपयाच्या घसरणीमागच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील अणुऊर्जा प्रकल्पावर झालेल्या हल्ल्याच्या बातमीनंतर सोमवारी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १११ डॉलरच्या जवळ पोहोचले. याबरोबरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात संभाव्य लष्करी पर्यायांचा विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रुपयाच्या घसरणीचा सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार असल्याचे म्हटले जाते. मात्र हा परिणाम नेमका कसा होतो? हे पाहू.

इंधनाच्या दरात वाढ
भारताला इंधनाची गरज भागविण्यासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. एकूण गरजेपैकी सुमारे ८८ टक्के तेल आपण आयात करतो. कच्च्या तेलाची खरेदी अमेरिकन डॉलर्समध्ये केली जाते. भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतर अशा वेळी तेल विपणन कंपन्यांना डॉलरच्या तुलनेत अधिक चलन द्यावे लागते.
यामुळेच सरकारने नुकतेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली होती.
भाजीपाला, खाद्यपदार्थ अशा दैनंदिन वस्तूंच्या महागाईत वाढ
इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे वाहतुकीचा खर्चही वाढतो. परिणामी, भाजीपाला, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनाश्यक वस्तूंच्या वाहतुकीच्या खर्चातही वाढ होते. त्यामुळे अशा वस्तूंच्या किमती महाग होण्याची शक्यता निर्माण होते. एवढेच नाही तर किराणा सामान, खाद्यतेल, पॅकेज्ड उत्पादने आणि उपकरणे अशा वस्तूंच्याही किमती वाढतात. यामुळे भारतीय कुटुंबाची क्रयशक्ती कमी होते.
सोने महाग होते
भारतात सोन्याची मोठी मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावे लागते. आयात डॉलरमध्ये होत असल्यामुळे भारतीय चलनावर ताण निर्माण होऊन आयात महाग होते. यामुळे स्थानिक बाजारातील ग्राहकांना अधिक किमतीत सोने घ्यावे लागते.
इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर आयात महाग
रुपयाच्या मूल्यातील बदलांमुळे आयात केलेल्या वस्तू आणि सेवांवर विपरीत परिणाम होतो. इंधन, सोने याशिवाय भारत इतर क्षेत्रातील आयातीवरही मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि चार चाकी वाहने (तसेच आयात होणारे सुटे भाग) अशा अनेक वस्तू भारतात आयात होत असतात. रुपयाची घसरण झाल्यामुळे या आयातीचा खर्च वाढतो.
कमकुवत झालेल्या रुपयाला अर्थशास्त्रज्ञ आयात केलेली महागाई म्हणतात. यामुळे आयात केलेल्या वस्तू आणि कच्च्या मालाची किंमत वाढत जाते. व्यवसायांना येणारा वाढीव खर्च अनेकदा वस्तूंच्या वाढलेल्या किमतींच्या स्वरूपात ग्राहकांवर लादला जातो. यामुळे हळूहळू महागाई वाढण्याची शक्यता वाढते.
ऑनलाइन आणि सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शन आणि सेवा महाग
ओटीटी सेवा, क्लाउड आधारित टूल्स आणि सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शन यांसारख्या विदेशी सेवांना डॉलरमध्ये पेमेंट करावे लागते. रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतर अशा सेवांसाठी जास्त चलन खर्च करावे लागते. रुपया जेव्हा अस्थिर असतो तेव्हा भारतीय वापरकर्त्यांना विदेशी सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागतात.

शेअर बाजाराला फटका बसण्याची शक्यता
रुपयाची घसरण झाल्यानंतर देशातील शेअर बाजारावरही तणाव येऊ शकतो. कमकुवत चलनामुळे विदेशी गुंतवणूकदारांना डॉलरच्या तुलनेत मिळणारा परतावा कमी होऊ शकतो, त्यामुळे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार त्यांचे पैसे बाजारातून काढून घेतात. ज्यामुळे शेअर बाजारातील निधीचा ओघ आटून अस्थिरता वाढू लागते.
परदेशी शिक्षण आणि प्रवास अधिक महाग
रुपया कमकुवत झाल्यामुळे विदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अधिक पैसे खर्च करावे लागतात. विदेशात शिक्षण घेत असताना विद्यापीठाची फी, राहण्याचा खर्च अमेरिकन डॉलर किंवा ब्रिटिश पाऊंडसारख्या परकीय चलनात द्यावा लागतो. रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतर अधिक पैसे खर्च करावे लागतात. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासाचा खर्चही वाढतो. विमान तिकीट, निवास, भोजन आणि खरेदीसाठी अधिक रुपयांची आवश्यकता भासते.
रुपया शंभरी पार करणार?
एका अमेरिकी डॉलरसाठी १०० रुपये मोजावे लागणार का? असा प्रश्न आता भारतीयांना सतावू लागला आहे. पश्चिम आशियातील युद्ध तणावाने तिमाहीत ज्या गतीने रुपया गडगडत आला आहे, ते पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रयत्नही निष्फळ ठरत आहेत.
रुपयाच्या मूल्यावर ताण आणणाऱ्या बाह्य घटकांमध्ये खनिज तेलाच्या किमतींचे स्थान सर्वात मोठे आहे. भारतावरच नव्हे तेल आयातीवर अवलंबून असलेल्या सर्वच अर्थव्यवस्थांच्या चलनांच्या वाट्याला हे भोग आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या दशकातील सर्वात लक्षणीय हस्तक्षेप आणि नियामक निर्बंधानंतरही, रुपयाने ९५ ची वेस ओलांडली. त्यामुळे डॉलरपुढे रुपयाची शंभरी आणि त्यापेक्षा अधिक नीचांक ही अशक्यप्राय गोष्ट नव्हे तर कधीही घडू शकणारी वास्तविक स्थिती असल्याचे आता चलन बाजारातील विश्लेषकही निःशंकपणे म्हणत आहेत.
