मुंबई : देशातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असलेल्या ‘एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड’च्या ९,८१२.९१ कोटी रुपयांच्या प्रारंभिक भागविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून दुसऱ्या दिवसाअखेर १०० टक्के भरणा पूर्ण झाला आहे. बुधवारपर्यंत या आयपीओला १.१७ पट प्रतिसाद लाभल्याचे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

या भागविक्रीच्या माध्यमातून एकूण १२.४५ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते, त्या बदल्यात दुसऱ्या दिवशी १४.५१ कोटी समभागांसाठी बोली प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव हिश्श्यासाठी सर्वाधिक २.६५ पट प्रतिसाद प्राप्त झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदार हिश्श्याला आतापर्यंत ९७ टक्के प्रतिसाद मिळाला आहे. तर पात्र संस्थात्मक खरेदीदार या श्रेणीत आतापर्यंत केवळ ८ टक्के सबस्क्रिप्शन झाले आहे.

सुकाणू गुंतवणूकदारांकडून २,६६३ कोटींची उभारणी

सार्वजनिक भागविक्री सुरू होण्यापूर्वी कंपनीने सुकाणू गुंतवणूकदारांकडून २,६६३ कोटी रुपये उभे केले आहेत. यामध्ये जीआयसी, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, ब्लॅकरॉक, फिडेलिटी मॅनेजमेंट, गोल्डमन सॅक्स आणि नॉर्जेस बँक यांसारख्या आघाडीच्या जागतिक संस्थांनी भाग घेतला. तसेच देशांतर्गत संस्थांमध्ये एलआयसी, एचडीएफसी म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड यांचा समावेश होता. गुरुवारी आयपीओसाठी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. आयपीओसाठी कंपनीने प्रतिसमभाग ५४५ ते ५७४ रुपये निश्चित करण्यात आली आहे.