SBI 1 Year FD Interest Rate: गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधणारे अनेक जण आजही फिक्स्ड डिपॉझिट (FD)ला पहिली पसंती देतात. विशेषतः भारतीय स्टेट बँक (SBI)सारख्या सरकारी बँकेत एफडी करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण सध्या एक वर्षाच्या एफडीवर नेमकं किती व्याज मिळतं? ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ मिळतो का? असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. जर तुम्हीही लवकरच एफडी करण्याचा विचार करीत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
भारतातील सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेकडून (SBI) सध्या एक वर्षाया एफडीवर वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळे व्याजदर दिले जात आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याजाचाही लाभ उपलब्ध आहे.
१ वर्षाच्या एफडीवर SBI किती व्याज देते?
सध्या तीन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी SBI खालीलप्रमाणे व्याजदर देत आहे.
- सामान्य ग्राहक (वय ५९ वर्षांपर्यंत): ६.२५ टक्के वार्षिक व्याज
- ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त): ६.७५ टक्के वार्षिक व्याज
- अति ज्येष्ठ नागरिक (वय ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त): ६.८५ टक्के वार्षिक व्याज
याचा अर्थ सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजाचा फायदा मिळतो. त्यामुळे निवृत्तीनंतर सुरक्षित उत्पन्नाचा पर्याय म्हणून अनेक जण एफडीला प्राधान्य देतात.
ज्येष्ठ नागरिकांना नेमका काय फायदा मिळतो?
भारतीय स्टेट बँक ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ०.५० टक्का अतिरिक्त व्याज देते. त्याचबरोबर ८० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या अति ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांपेक्षाही ०.१० टक्का अधिक व्याज मिळते.
परिणामी वयोवृद्ध ग्राहकांना त्यांच्या बचतीवर तुलनेने अधिक परतावा मिळण्याची संधी उपलब्ध होते.
व्याजदर शेवटचे कधी बदलले?
भारतीय स्टेट बँकेने डिसेंबर २०२५ मध्ये एफडीवरील व्याजदरात शेवटचा बदल केला होता. त्यानंतर बँकेने एफडी व्याजदरात कोणताही मोठा बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या हेच व्याजदर ग्राहकांसाठी लागू आहेत.
रेपो दराचा एफडीवर कसा परिणाम होतो?
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग चौथ्यांदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने शेवटचा बदल डिसेंबर २०२५ मध्ये केला होता. त्यावेळी रेपो दर ०.२५ टक्क्याने कमी करून, ५.२५ टक्के करण्यात आला होता.
रेपो दराचा परिणाम केवळ कर्जावरील व्याजदरावरच होत नाही, तर एफडीवरील व्याजदरावरही होतो.
रेपो दर कमी झाल्यास बँका एफडीवरील व्याजदर कमी करण्याची शक्यता असते.
रेपो दर वाढल्यास एफडीवरील व्याजदरही वाढू शकतात.
म्हणूनच एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी रेपो दरातील बदल आणि बँकेचे अद्ययावत व्याजदर तपासणे फायदेशीर ठरू शकते.
एफडी करण्यापूर्वी ही माहिती लक्षात ठेवा
एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जात असली तरी गुंतवणूक करण्यापूर्वी कालावधी, व्याजदर, कराचे नियम आणि स्वतःच्या आर्थिक गरजा यांचा विचार करणे आवश्यक आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या अतिरिक्त व्याजाचा लाभ घेता येतो का, हेही तपासून पाहावे.
(टीप : वरील व्याजदर ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींसाठी लागू असून, बँकेच्या धोरणानुसार भविष्यात त्यात बदल होऊ शकतो. एफडी करण्यापूर्वी संबंधित शाखेत किंवा अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत व्याजदर तपासून घ्यावेत.)
