मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँकेकडून (एसबीआय) चालू आर्थिक वर्षात सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून, बँकेच्या शाखा विस्तार करण्यात येणार असून सुमारे २०० ते २५० शाखांची भर पडण्याची शक्यता आहे. मनुष्यबळाची गरज आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन भरतीचे प्रमाण निश्चित केले जाईल, अशी माहिती स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी दिली.

चालू आर्थिक वर्षात अधिकारी आणि लिपिक संवर्गात मिळून सुमारे ११ हजार ते १२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे बँकेचे नियोजन आहे. वर्षअखेरीस सुमारे १२ हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे प्रमाण आणि बँकेच्या बदलत्या गरजेनुसार हा आकडा कमी-अधिक होऊ शकतो. गेल्या आर्थिक वर्षात स्टेट बँकेने मोठ्या प्रमाणावर भरती केली होती. त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तब्बल १,५०० विशेष अधिकारी (स्पेशालिस्ट आयटी ऑफिसर्स) नियुक्त करण्यात आले होते. यंदा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरतीची आवश्यकता नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी २५,६३३ नियुक्त्या

स्टेट बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेने एकूण २५,६३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. यामध्ये ४,६४० अधिकारी, १९,३४० असोसिएट्स आणि १,६५३ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मार्च २०२६ अखेरीस एसबीआयच्या कर्मचारी संख्येने २.४५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या रोजगारदात्यांमध्ये स्टेट बँकेचा समावेश होतो.

२५० नव्या शाखांची भर

स्टेट बँकेचे देशभर मोठे शाखा जाळे असले तरी अनेक भागांमध्ये अद्याप बँकेच्या विस्ताराला वाव असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. नव्या वसाहती विकसित होत असलेल्या भागांबरोबरच व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय जिल्ह्यांमध्येही बँकेची उपस्थिती वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याच वेळी काही शाखांचे पुनर्रचनाही करण्यात येणार आहे. त्यामुळे शाखांची एकूण संख्या दरवर्षी निव्वळ २०० ते २५० ने वाढविण्याचे बँकेचे नियोजन असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

‘एनएसई’तील १ टक्का हिस्सा विकणार

दरम्यान, प्रस्तावित राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) प्रारंभिक समभाग विक्रीत (आयपीओ) एसबीआय समूहाकडून सुमारे १ टक्का हिस्सा विकला जाणार आहे. स्टेट बँक आणि त्याची उपकंपनी एसबीआय कॅपिटल मार्केट्स यांच्याकडे असलेल्या हिस्स्यातून ही विक्री केली जाणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

स्टेट बँकेकडून ०.६५ टक्का, तर एसबीआय कॅपिटल मार्केट्सकडून ०.३५ टक्का हिस्सा विकण्याचे नियोजन आहे. मात्र, इतर भागधारकांनीही आयपीओमध्ये हिस्सा विकण्याचा निर्णय घेतल्यास एसबीआय समूहाकडून होणारी विक्री १ टक्क्यापेक्षा कमी असू शकते, असे त्यांनी सांगितले. सध्या स्टेट बँकेची एनएसईमध्ये ३.२३ टक्केहिस्सेदारी , तर एसबीआय कॅपिटल मार्केट्सकडे ४.३३ टक्के हिस्सा आहे.

देशातील सर्वात मोठ्या आयपीओची शक्यता

एनएसईला गेल्या आठवड्यात बहुप्रतीक्षित ३० हजार कोटी रुपयांच्या आयपीओसाठी नियामकीय मंजुरी मिळाली आहे. प्रस्तावित आकारमानानुसार हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. एनएसईचा आयपीओ २०२४ मधील ह्युंदाई मोटर इंडियाच्या २७,८५८.७५ कोटी रुपयांच्या आयपीओला मागे टाकेल. याशिवाय २०२२ मधील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) २०,५५७.२३ कोटी रुपये, २०२१ मधील पेटीएमची १८,३०० कोटी रुपये, २०२५ मधील टाटा कॅपिटलची १५,५११.८७ कोटी रुपये आणि २०१० मधील कोल इंडियाची १५,२०० कोटी रुपयांची समभाग विक्रीही एनएसईच्या प्रस्तावित आयपीओपेक्षा कमी होती.

अन्य उपकंपन्यांतील हिस्सा विक्री नाही

एसबीआयच्या इतर उपकंपन्यांमधील हिस्सा तातडीने विकण्याचे किंवा त्याचे ‘मॉनिटायझेशन’ करण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.जुलैमध्ये एसबीआयने फ्रान्सस्थित अमुंडी या भागीदारासोबत एसबीआय म्युच्युअल फंडमधील सुमारे १० टक्के हिस्सा विकला होता. या समभाग विक्रीतून सुमारे ११,६७५ कोटी रुपये उभारण्यात आले. देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड कंपनीच्या या व्यवहाराला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो तब्बल ४१.६६ पट भरला गेला.

या व्यवहारानंतर स्टेट बँकेचा एसबीआय म्युच्युअल फंडमधील हिस्सा ६१.८६ टक्क्यांवरून ५५.५६ टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे अमुंडीचा हिस्सा ३.७ टक्क्यांनी घटून ३२.६३ टक्क्यांवर आला आहे.