तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि तुम्ही या बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर कर्जाचा हप्ता (ईएमआय) थकवू नका. तुम्ही बँकेचा हप्ता थकवला तर बँकेने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे. जे ग्राहक बँकेचे हप्ते थकवतात किंवा एखादा हप्ता चुकवू शकतात अशा ग्राहकांसाठी बँकेने एक योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे बँक ग्राहकांना थकलेला हप्ता भरण्याची आठवण करून देईल.
बँकेला जर वाटलं की एखादा ग्राहक वेळेवर पेमेंट करणार नाही तर बँक त्याच्या घरी चॉकलेट पाठवेल. बँकेने म्हटलं आहे की जो ग्राहक वेळेवर ईएमआय भरणार नसतो तो बँकेचे रिमाईंडर कॉल्स घेत नाही. त्यावरून आम्हाला अंदाज येतो की हा ग्राहक यावेळी वेळेवर हप्ता भरणार नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना बँक त्याच्या घरी चॉकलेट पाठवून त्याला हप्ता भरण्याची आठवण करून देईल.




बँकिंग क्षेत्रात अलिकडच्या काळात किरकोळ कर्जात वाढ झाली आहे. त्याचबरोबर मासिक ईएमआयमध्ये डिफॉल्टची प्रकरणंही वाढली आहेत. त्यामुळे अनेक बँका कर्जाच्या, ईएमआयच्या परतफेडीसाठी वेगवेगळे उपाय अवलंबू लागल्या आहेत. एसबीआयची ही चॉकलेट योजना कर्जाच्या वसुलीत उपयोगी पडेल असं बँकेला वाटतंय.
हे ही वाचा >> ‘इंडिया’चा वृत्तनिवेदकांवर बहिष्कार, नितीश कुमारांची वेगळी भूमिका; म्हणाले, “आमच्याबरोबर असलेल्या लोकांना…”
एसबीआयची किरकोळ कर्जे जून २०२३ च्या तिमाहीत १२,०४,२७९ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहेत. जून २०२२ च्या तिमाहीत बँकेची किरकोळ कर्जे १०,३४,१११ कोटी रुपये इतकी होती. बँकेच्या किरकोळ कर्जात यंदा १६.४६ टक्के वाढ झाली आहे.