मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने कर रचनेतील बदलांच्या पार्श्वभूमीवर, खुल्या बाजारातून समभाग पुनर्खरेदी (शेअर बायबॅक) पुन्हा सुरू करण्याचा गुरुवारी प्रस्ताव मांडला आहे.
कंपन्यांना त्यांचे समभाग पुन्हा खरेदी करण्यासाठी एक अतिरिक्त मार्ग म्हणून, खुल्या बाजारातून समभाग पुनर्खरेदीची सुविधा पुन्हा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून खुल्या बाजारातून समभाग पुनर्खरेदी बंद करण्यात आली होती.
समभाग पुनर्खरेदीची ही पद्धत पुन्हा सुरू केल्यामुळे कंपन्यांना पुनर्खरेदी करण्यासाठी एक अतिरिक्त मार्ग उपलब्ध होईल. त्याच वेळी, भागधारकांना समान संधी आणि कराच्या बाबतीतही समान वागणूक मिळेल असे सेबीने सल्लामसलत पत्रात नमूद केले आहे. तसेच या प्रस्तावानुसार, शेअर बाजारांमार्फत समभाग पुनर्खरेदीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या रचनेनुसार, कंपन्या ‘टेंडर ऑफर’ पद्धतीद्वारे किंवा ‘बुक-बिल्डिंग’ प्रक्रियेचा वापर करून खुल्या बाजारातून समभाग पुनर्खरेदी करू शकतात. सेबीच्या या प्रस्तावावर २३ एप्रिलपर्यंत प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
कंपन्यांकडून भागधारकांच्या पदरात लाभ देता यावा यासाठी केल्या जाणाऱ्या समभाग पुनर्खरेदी अर्थात शेअर बायबॅकच्या रकमेला आता भांडवली नफा म्हणून गृहित धरला जातो. या बदलामुळे, यापूर्वी कंपन्यांनाच ‘बायबॅक कर’ भरावा लागत असलेली जुनी पद्धत आता संपुष्टात आणली होती. कर रचनेतील या बदलांनुसार, १ एप्रिल २०२६ पासून, पुनर्खरेदीच्या व्यवहारातून मिळणारी रक्कम भागधारकांच्या हाती ‘भांडवली नफा’ या शीर्षकाखाली करपात्र ठरेल.
