भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने गुरुवारी एकापेक्षा अधिक बाजार मंचावर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागांची नवा प्रस्ताव मांडला आहे. एखाद्या मंचावर व्यवहार (ट्रेडिंग) न झाल्यामुळे शेअरच्या किमतीत येणारा फरक दूर करण्यासाठी, ‘प्री-ओपन कॉल ऑक्शन’ आणि ‘प्राईस बँड’साठी एकसमान  पायाभूत किंमत (बेस प्राईस) ठरवणारी यंत्रणा सुरू करण्याचा सेबीचा विचार आहे.

 काही कमी उलाढाल असलेल्या समभागांच्या बाबतीत असे दिसून आले आहे की, एका मंचावर व्यवहार न झाल्यामुळे आणि दुसऱ्या मंचावर व्यवहार सुरू राहिल्यामुळे, दोन्ही मंचावरील शेअरच्या बंद किमतीत मोठा फरक पडतो. सध्या बाजार मंच आपापल्या मंचावरील आदल्या दिवसाच्या बंद किमतीच्या आधारे स्वतंत्रपणे प्रत्येक शेअरचा प्राईस बँड (सर्किट लिमिट) ठरवतात, असे या संदर्भातील सल्लागार पत्रात सेबीने नमूद केले आहे.

गुंतवणूकदारांना काय फायदा?

या प्रस्तावामुळे एकाच समभागाच्या किंमतीत विविध शेअर बाजारांवर होणारी विसंगती कमी होईल. तसेच काही समभाग एका बाजारात व्यवहाराशिवाय राहण्याची शक्यता घटेल. परिणामी, किंमत शोध प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यास मदत मिळेल. सेबीने या प्रस्तावांवर बाजारातील सहभागी आणि गुंतवणूकदारांकडून २ जुलैपर्यंत सूचना व हरकती मागवल्या आहेत. प्रस्ताव अंतिम झाल्यानंतर भारतीय भांडवली बाजारातील किंमत निर्धारण प्रक्रियेत महत्त्वाचा बदल घडू शकतो.

सेबीचा प्रस्ताव काय?

परिस्थिती १ (सर्व एक्स्चेंजवर ट्रेडिंग झाले किंवा कुठेच झाले नाही): जर एखाद्या शेअरचे आदल्या दिवशी सर्व एक्स्चेंजवर ट्रेडिंग झाले असेल किंवा सर्वच एक्स्चेंजवर तो ‘नॉन-ट्रेडेड’ (ट्रेडिंग न झालेला) राहिला असेल, तर प्रत्येक एक्स्चेंज पुढील दिवसाचा प्राईस बँड ठरवण्यासाठी आपापली बंद किंमत (Closing Price) वापरू शकते.

परिस्थिती २ (केवळ एकाच एक्स्चेंजवर ट्रेडिंग झाले): जर शेअरचे ट्रेडिंग फक्त एकाच एक्स्चेंजवर झाले असेल आणि दुसऱ्या एक्स्चेंजवर झाले नसेल, तर ज्या एक्स्चेंजवर ट्रेडिंग झाले आहे तिथली ‘क्लोजिंग प्राईस’ दुसऱ्या एक्स्चेंजलाही पुढील दिवसाच्या प्राईस बँडसाठी आणि प्री-ओपन कॉल ऑक्शनसाठी ‘बेस प्राईस’ म्हणून वापरावी लागेल.

परिस्थिती ३ (दोन किंवा अधिक एक्स्चेंजवर ट्रेडिंग झाले, पण काही ठिकाणी नाही झाले): जर शेअरचे ट्रेडिंग दोन किंवा अधिक एक्स्चेंजवर झाले, पण एखाद्या एक्स्चेंजवर झाले नसेल, तर ज्या एक्स्चेंजवर सर्वात जास्त ट्रेडिंग वॉल्यूम (उलाढाल) झाली आहे, तिथली क्लोजिंग प्राईस घेतली जाईल.

पुढील पाऊल आणि अंमलबजावणी

ही यंत्रणा सुरळीतपणे राबवण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजनी एकमेकांसोबत बंद भावाची (क्लोजिंग प्राईस) आकडेवारी सामायिक करावी लागेल आणि आवश्यक ते करार करावेत, असे सेबीने म्हटले आहे. सेबीने या प्रस्तावांवर सर्वसामान्यांकडून आणि बाजारातील घटकांकडून २ जुलै २०२६ पर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत.