Self made Indian entrepreneurs success stories : भारतात जेव्हा यशस्वी उद्योगपतींची चर्चा होते, तेव्हा आपसूक टाटा-अंबानींसारख्या घराण्यांची नावं ओठांवर येतात. देशातील बहुतेक क्षेत्रात अशाच कार्पोरेट कुटुंबांचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र, गेल्या काही दशकांपासून परिस्थिती बदलत आहे. कोणत्याही व्यावसायिक पार्श्वभूमीशिवाय, केवळ नवीन कल्पना, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर शून्यातून कोट्यवधींचे साम्राज्य उभारणाऱ्या ‘सेल्फ-मेड’ उद्योजकांची संख्या देशात वाढत आहे. यंदा १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या करदात्यांच्या संख्येत तब्बल ३९ टक्के झालेली वाढ हे याचंच द्योतक आहे. आज अशाच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अवलियांची यशोगाथा जाणून घेऊ.

vijay shekhar sharma
विजय शेखर शर्मा (Paytm)

१. विजय शेखर शर्मा (Paytm)

उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील अतरौली या लहानशा गावचे रहिवासी असलेले विजय शेखर शर्मा यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. हिंदी माध्यमातून शिक्षण झाल्याने दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंग्रजी समजणे कठीण गेले. विजय यांनी आपल्या याच कमकुवत बाजूवर काम करण्याचा निर्णय घेतला. हिंदी आणि इंग्रजी पुस्तके-मासिकांचा एकाच वेळी अभ्यास करून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले. कॉलेजमध्ये कोडिंग शिकून त्यांनी पहिली वेबसाईट बनवली आणि १० लाखांना विकली. २००० मध्ये वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडची स्थापना केली. काही निर्णय चुकले आणि ३२ लाखांचे कर्ज झाले. मात्र, २०१० मध्ये सुरू केलेल्या ‘पेटीएम’ने २०१६ च्या नोटाबंदीनंतर देशात डिजिटल पेमेंटची क्रांती आणली. आज पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडचे बाजार भांडवल १ लाख कोटी रुपयांच्या पुढे आहे.

deepinder goyal
दीपिंदर गोयल (Zomato)

२. दीपिंदर गोयल (Zomato)

पंजाबच्या संगरूर येथील मूळ रहिवासी असलेले दीपिंदर गोयल यांचे आयआयटी दिल्ली मधून शिक्षण झाले आहे. शालेय जीवनात ते फारसे हुशार नव्हते आणि आठवीच्या वर्गात नापासही झाले होते. मात्र, नंतर शिक्षणात रस निर्माण झाल्याने चांगले शिक्षण घेतले. ‘बॅन अँड कंपनी’मध्ये नोकरी करत असताना जेवणासाठी हॉटेल शोधण्यास मित्रांना अडचण आली. यातूनच त्यांना फूड डिलिव्हरी व्यवसायाची कल्पना सुचली. दीपिंदर यांनी २००८ मध्ये Foodiebay.com सुरू केले, ज्याचे २०१० मध्ये झोमॅटो असे नामकरण झाले. २०२१ मध्ये झोमॅटोचा यशस्वी आयपीओ आला आणि त्यानंतर ब्लिंकीटचे अधिग्रहण करून त्यांनी क्विक-कॉमर्स क्षेत्रात अव्वल स्थान मिळवले. सध्या इटरनल लिमिटेडचे (झोमॅटोची मूळ कंपनी) बाजार भांडवल अंदाजे ३.०४ लाख कोटी ते ३.०७ लाख कोटी रुपये इतके आहे.

ritesh agrawal
रितेश अग्रवाल (OYO Rooms)

३. रितेश अग्रवाल (OYO Rooms)

आज भारतच नाही तर जगभरात रास्त दरात राहण्याची सोय म्हणून ‘ओयो रूम्स’कडे पाहिले जाते. मात्र, याची सुरुवात ओडिशातील एका खेड्यात जन्मलेल्या १८ वर्षीय तरुणाने केली असं सांगितलं तर विश्वास बसेल का? रितेश अग्रवाल असं या तरुणाचे नाव असून तो ओडिशातील रायगडा या जिल्ह्यातील बिस्समकटक या गावचा रहिवासी आहे. रितेश यांनी अवघ्या १३ व्या वर्षी सिमकार्ड विकण्यापासून आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती. त्यांना प्रसिद्ध थील फेलोशीप अंतर्गत १ लाख डॉलरचे (सुमारे ८० लाख रुपये) सीड फंडिंग मिळाले. देशभरात प्रवास करताना बजेटमध्ये हॉटेल्स शोधताना त्यांना खूप अडचणी आल्या. यातूनच मग त्यांनी २०१२ मध्ये ओरावेल स्टेज् आणि २०१३ मध्ये ओयो रूम्सची स्थापना केली. सुरुवातीला स्वतः झाडू मारण्यापासून ते ग्राहकांच्या तक्रारी निवारण्यापर्यंतची सर्व कामे केली. आज रितेश अग्रवाल यांची ओयोच्या जगभरात शाखा आहेत.

falguni nayar
फाल्गुनी नायर (Nykaa)

४. फाल्गुनी नायर (Nykaa)

साधारण पन्नाशीत आल्यानंतर कोणीही निवृत्तीचा विचार करत असतो. फाल्गुनी नायर यांनी या विचाराला छेद देत निवृत्तीच्या वयात स्टार्टअप सुरू केले. फाल्गुनी नायर यांनी आयआयएम अहमदाबादमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं असून कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये तब्बल १९ वर्षे काम केले. नोकरी सोडण्यापूर्वी त्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावर काम करत होत्या. फाल्गुनी नायर यांनी २०१२ मध्ये आपली २ कोटी रुपयांची बचत गुंतवणून नायका ब्रँडची सुरुवात केली. भारतीय महिलांना विश्वासार्ह आणि वाजवी दरात सौंदर्य प्रसाधने उपलब्ध नाहीत, ही गरज ओळखून त्यांनी आपलं उत्पादन सुरू केलं.

radhakishan damani
राधाकिशन दमानी (DMart)

५. राधाकिशन दमानी (DMart)

मुंबईतील एका चाळीत लहानाचे मोठे झालेल्या राधाकिशन दमानी यांनी बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले नाही. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी कौटुंबिक बॉल-बेअरिंगचा व्यवसाय बंद करून १९८० च्या दशकात शेअर बाजारात प्रवेश केला. शेअर बाजारातील ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’द्वारे मोठं भांडवल जमा केल्यानंतर त्यांनी २००२ मध्ये मुंबईतील पवई येथे डी-मार्टचे पहिले स्टोअर सुरू केले. भाड्याच्या जागेऐवजी स्वतःची जमीन खरेदी करणे, जाहिरातींवर कमी खर्च आणि ग्राहकांना सवलतीच्या दरात वस्तू देणे या मॉडेलमुळे डीमार्ट प्रचंड यशस्वी ठरले. २०१७ मध्ये एवेन्यू सुपरमार्ट्सच्या आयपीओनंतर दमानी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत आले.