मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी झालेला अंतरिम शांतता करार रद्द ठरविणे आणि त्या परिणामी खनिज तेलाच्या किमतीच्या भडक्याने भांडवली बाजारात बुधवारी मोठी पडझड घडवून आणली. सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
जागतिक बाजारातील नकारात्मक कल आणि पहिल्या तिमाहीतील निकालांबाबतच्या चिंतेमुळे देखील गुंतवणूकदारांचा ‘रिस्क-ऑफ’ अर्थात जोखीम टाळणारा सावध कल दिसून आला. पूर्णपणे नकारात्मक राहिलेल्या सत्राअखेर सेन्सेक्स १,६७७.१२ अंशांनी म्हणजेच २.१५ टक्क्यांनी घसरून ७६,५०३.६० पातळीवर बंद झाला. सत्रातंर्गत त्याने १,९२१.६९ अंश गमावत ७६,२५९.०३ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे निफ्टीने ५१६.६५ अंश गमावत २३,८८२.०५ अंशांच्या पातळीला स्पर्श केला.
इराणशी कोणतेही व्यवहार करायचे नाहीत, ते अत्यंत क्रूर आणि हिसंक असून विकृत मानसिकतेचे लोक आहेत, आणि त्याचे नेतृत्वही तितक्याच विकृत लोकांच्या हाती आहे. जर त्यांच्याकडे अण्वस्त्र असते, तर त्यांनी आतापर्यंत त्याचा वापरही केला असता, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान केले. ज्याने जगभरातील भांडवली बाजारात भीतीदायी विक्रीचा थरकाप उडवून देणारा परिणाम साधला.
होर्मूझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार रद्द केल्याचे जाहीर केले. यामुळे भू-राजकीय तणाव पुन्हा वाढला आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत नवीन चिंता निर्माण झाली, ज्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत भांडवली बाजारात चौफेर विक्रीचा मारा सुरू झाला, असे ‘एनरिच मनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर. यांनी सांगितले.
खनिज तेलाचा भडका आणि रुपयाची ऐतिहासिक घसरण
इराणने होर्मूझच्या सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर केलेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी करार रद्द केल्याची एकतर्फी घोषणा केली. यामुळे जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे दर ६.१८ टक्क्यांनी वधारून ७८.७४ डॉलर प्रति पिंपावर पोहोचले. जागतिक भांडवली बाजाराचा पुन्हा मंदीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतला. खनिज तेलाच्या या दरवाढीचा थेट फटका भारतीय चलनावर दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपया ५९ पैशांनी घसरून ९५.५५ च्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
बाजारातील चौफेर पडझड
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, मारुती सुझुकी, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, कोटक महिंद्र बँक आणि महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग घसरले. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या समभागांमध्ये ४.६० टक्क्यांची, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये ३.५१ टक्क्यांची आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ३.२० टक्क्यांची घसरण झाली. रंग निर्मितीतील कंपन्यांचे समभागही आपटले. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध असलेल्या ३,२११ कंपन्यांचे समभाग घसरले, तर केवळ १,०७० कंपन्यांचे समभाग वधारले.
