मुंबई: अमेरिकेतील रोजगाराच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत आकडेवारीमुळे तेथील मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून नजीकच्या काळात व्याजदर वाढीच्या शक्यतेवर मर्यादा आल्याच्या पार्श्वभूमीवर, विशेषत: माहिती-तंत्रज्ञान (आयटी) समभागांच्या वाढलेल्या खरेदीने शुक्रवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी वधारून बंद झाले. निर्देशांकांमधील ही तेजीची मालिका सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली.

सेन्सेक्स २६१.७९ अंशांनी वधारून ७७,७६३.९१ पातळीवर बंद झाला. त्याने ६५५.४ अंशांची कमाई करत ७८,१५७.५२ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे निफ्टी ९५.१५ अंशांनी वधारून २४,२७०.८५ पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी एचसीएल टेक ५.७९ टक्क्यांनी वधारला, त्या पाठोपाठ टेक महिंद्र, भारती एअरटेल, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, बजाज फायनान्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांची कामगिरी चमकदार राहिली. दुसरीकडे, ॲक्सिस बँक, स्टेट बँक, महिंद्र अँड महिंद्र आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांचे समभाग घसरले.

जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेत आणि जागतिक व्याजदरांच्या बाबतीत अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची वाढती शक्यता, यामुळे अस्थिरता आणि नफावसुली होऊनही देशांतर्गत बाजार वधारून बंद झाले. भारत-जपान शिखर परिषदेचे सकारात्मक निष्कर्ष आणि आयटी क्षेत्रातील सातत्यपूर्ण सुधारणा यामुळे बाजारातील खरेदीपूरक भावना अधिक बळकट झाली. देशांतर्गत आघाडीवर, खनिज तेलाच्या किमतीतील घसरण हा एक महत्त्वाचा सकारात्मक घटक ठरत आहे; यामुळे महागाईचा अंदाज, बाह्य समतोल आणि एकूणच आर्थिक स्थैर्य यांना आधार मिळाला आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.