Shankaran Naren Gold-Silver Investment View: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होत असताना, एक्सवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे एका अनुभवी फंड व्यवस्थापकाचा या मालमत्तांकडे (सोने आणि चांदी) पाहण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आहे, याकडे लक्ष वेधले गेले आहे. त्यांचे मत आहे की सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आता निघून गेली आहे.

आशिष कुमार मेहर नावाच्या युजरने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे कार्यकारी संचालक आणि सीआयओ शंकरन नरेन यांनी मौल्यवान धातूंमध्ये (सोने आणि चांदी) गुंतवणूक करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण दिले आहे.

सोन्या-चांदीकडे स्वतंत्र गुंतवणुकीच्या संधी म्हणून पाहण्याऐवजी, नरेन केवळ मल्टी-ॲसेट म्युच्युअल फंडांच्या माध्यमातूनच त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

ते म्हणाले, “जर मी दीर्घकालीन दृष्टिकोन घेतला, तर ज्या चौकटीत आम्ही गुंतवणूक करतो, त्यामध्ये सोने आणि चांदी सर्वात धोकादायक मालमत्ता बनल्या आहेत. माझ्या दृष्टिकोनातून, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आता राहिलेली नाही. तुम्ही सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मल्टी-ॲसेट फंड्स. त्याशिवाय आम्ही सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यावर विश्वास ठेवत नाही, याचे कारण हेच आहे की सध्याच्या घडीला सोने आणि चांदी हा जगातील सर्वोत्तम कामगिरी करणारा मालमत्ता वर्ग ठरला आहे.”

एक्सवर शेअर केलेला नरेन यांचा व्हिडिओ INDmoney चॅनलवरील ‘द नेट वर्थ शो’ या पॉडकास्टमधील आहे. या पॉडकास्टमध्ये सोने-चांदीतील गुंतवणूक करण्याच्या योग्य वेळेबद्दल बोलताना शंकरन नरेन म्हणाले होते की, “हे खूप सोपे आहे. तुम्ही कायम भूतकाळातील खूप चांगली कामगिरी पाहता. मग, २०१३ सालाचा विचार करा. त्यावेळी भारतीय रिअल इस्टेट क्षेत्र हे सर्वोत्तम कामगिरी करणारा मालमत्ता वर्ग होता. तेव्हाच्या गेल्या पाच वर्षांपासून भारतीय इक्विटीची कामगिरी खूपच खराब होती. त्यामुळे, त्या वेळी पाहिल्यास, हे अगदी सोपे होते की तुम्हाला रिअल इस्टेट मालमत्तेतून भारतीय इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची आहे.”

ते पुढे म्हणाले की, “माझ्या मते मालमत्ता वर्ग निवडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, जर अनेक वर्षे एखाद्या मालमत्ता वर्गाने खूपच खराब कामगिरी केली असेल, तर तुम्ही त्या मालमत्ता वर्गाबद्दल सकारात्मक असले पाहिजे. दुसरीकडे, जर एखाद्या मालमत्ता वर्गाने अलीकडच्या काळात अत्यंत चांगली कामगिरी केली असेल, तर तुम्हाला खूप सावध राहावे लागेल.”