Share Market Crash Today : भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांच्या तोंडचं पाणी पळवले आहे. गुरुवारी सकाळी काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी धडाधड कोसळले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नव्या हल्ल्याचे संकेत दिल्यानंतर, जागतिक बाजारासह भारतीय शेअर बाजारातही मोठी खळबळ उडाली आहे. या तीव्र विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने अवघ्या एका तासात गुंतवणूकदारांचे तब्बल ९.५ लाख कोटी रुपये बुडाले असून, बीएसईवरील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल घसरून ४,६२,५२,४९२.४२ कोटी रुपयांवर आले आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी पडझड

सकाळच्या सत्रापासूनच शेअर बाजारात घसरणीचा ट्रेण्ड पाहायला मिळाला. निफ्टी ५० जवळपास ३०० अंशांनी कोसळून थेट २२,५00 च्या महत्त्वाच्या आधारपातळीच्या खाली घसरला आहे. बीएसई सेन्सेक्स ८५० हून अधिक अंकांनी पडून ७१,८०० च्या खाली आला आहे. तर बँक निफ्टी ३५० हून अधिक अंशांनी घसरत लाल निशाण्यात व्यवहार करत आहे. बीएसईवरील ३० पैकी तब्बल २७ तर निफ्टीच्या ५० पैकी ४४ शेअर्समध्ये मोठी विक्री पाहायला मिळत आहे. टाटा स्टील, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, श्रीराम फायनान्स आणि अदानी पोर्ट्स हे शेअर्स सर्वाधिक तोट्यात असलेले दिसत आहे.

बाजार कोसळण्यामागची ‘प्रमुख ३ कारणे’

१. अमेरिका-इराण युद्ध आणि वाढता तणाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला इशारा दिला आहे. अमेरिका इराणशी दोन हात करू शकते किंवा त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते, अशी धमकी दिली आहे. या संघर्षानंतर जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्याचा थेट नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.

२. अमेरिकन बॉण्ड यील्डमध्ये जोरदार रिकव्हरी

अमेरिकेचा १० वर्षांचा आणि ३० वर्षांचा ट्रेझरी बॉण्ड यील्ड ५.६७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सेबी-नोंदणीकृत बाजार तज्ज्ञ अनुज गुप्ता यांच्या मते, बॉण्ड यील्डमधील ही वाढ अत्यंत धोकादायक असून, यामुळे परदेशी गुंतवणूकदार इक्विटी मार्केटमधून पैसे काढून सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बॉण्ड बाजाराकडे वळवत आहेत. आधीच परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून बाहेर पडत असताना, ही वाढ त्यात भर टाकणार आहे.

३. कच्चे तेल भडकले

अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे देशातील आयात खर्च वाढेल आणि महागाईमुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला.

तज्ज्ञांचे मत काय?

सध्याच्या या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता बाजारातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.